Aurangabad Top 5: नेत्यांच्या शेरेबाजीने काल दणाणलं औरंगाबाद, जाणून घ्या आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या थाटात साजरा झाल्यानंतर औरंगाबादमध्ये आता 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी हे साहित्य संमेलन आयोजित केले आहे.

Aurangabad Top 5: नेत्यांच्या शेरेबाजीने काल दणाणलं औरंगाबाद, जाणून घ्या आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या
cm uddhav thackeray

1.मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी राजकीय फटकाऱ्यांना उधाण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr, Bhagwat Karad), माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी दिग्गज मंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘ व्यासपीठावर उपस्थित आजी-माजी अन् सोबत आले तर ‘भावी’ सहकाऱ्यांनो…’ या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याने राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीच्या चर्चांना अधिकच हवा मिळाली. यासह रावसाहेब दानवे यांच्या तुफान फटकेबाजीचीही चर्चा राज्यात सत्र आहे. एकूणच औरंगाबादमधील कालचा दिवस हा राजकीय फटकेबाजीमुळे गाजला आणि पुढचे काही दिवस त्यावरील क्रिया-प्रतिक्रिया दिसत राहतील.

2. औरंगाबादेत आता तयारी साहित्य संमेलनाची

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या थाटात साजरा झाल्यानंतर औरंगाबादमध्ये आता 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी हे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. औरंगाबाद येथील लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषदेच्या सहयोगातून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी शुक्रवारी यासंबंधीची पत्रकार परिषद घेतली. संमेलनाचे स्थळ यशवंतराव चव्हाण सभागृह असून संमेलनाच्या उद्घटनासाठी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित राहतील. दरम्यान, संमेलन स्थळावर ग्रंथ प्रदर्शनाचे स्टॉल लावण्यासाठी बुकिंगदेखील सुरु झाली आहे.

3. शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान

मागील 15 दिवसांपासून शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. 1ते 15 सप्टेंबरपर्यंत शहरात तब्बल 40 डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर खासगी रुग्णालयांमध्ये 44 संशयितांवर उपचार सुरु असल्याची शासकीय माहिती हाती आली होती. मात्र प्रत्यक्षात लहान-मोठ्या रुग्णालयांमधील ताप, अंगदुखी, अशक्तपणाच्या रुग्णांची संख्या कितीतरी पटींनी जास्त आहे. शहरातील रोगराईचे वाढते प्रमाण पाहून महापालिकेनेही प्रत्येक झोनमध्ये कर्मचाऱ्यांमार्फत औषध फवारणी सुरु केली आहे. काही दिवसांनंतर याचा परिणाम दिसून येईल. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणी शोधून त्यांचा नायनाट करण्याची विशेष मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

4. शहराच्या आरोग्य सेवेत आणखी 8 रुग्णवाहिका दाखल

राज्य सरकारने महापालिकेला कोरोना संसर्गाशी लढा देण्यासाठी सीएसआर फंडातून दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून दोन कार्डियाक आणि सहा साध्या पद्धतीच्या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. अशा एकूण आठ रुग्णवाहिकांचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात आले. शनिवारपासून या रुग्णवाहिका शहराच्या आरोग्यसेवेत पूर्ण क्षमतेने दाखल होतील. साध्या पद्धतीच्या रुग्णवाहिका 78 लाख 75 हजार रुपयांत एसएमएल इसुझू कंपनीकडून खरेदी केल्या आहेत. तसेच दोन कार्डियाक रुग्णवाहिका 58 लाख 43 हजार रुपयांच्या असून त्याही एसएमएल इसुझू कंपनीकडून घेण्यात आल्या आहेत. या आठ रुग्णवाहिकांसाठी 1 कोटी 37 लाख 18 हजार रुपयांना खर्च आला.

5. वडगावातील ‘त्या’ कामगाराच्या आत्महत्येचे रहस्य उलगडले

वाळूज परिसरातील वडगावातील संतोष विठ्ठल वाघमारे या बेपत्ता कामगाराच्या आत्महत्येचे रहस्य उलगडले आहे.पत्नीचे लग्नापूर्वीचे परपुरूषासोबतचे फोटो पाहून संतोषने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे. 9 सप्टेंबरपासून कंपनीत कामाला जातो म्हणून संतोष निघून गेला होता. मात्र त्या दिवशी रात्रीपर्यंत तो परत न आल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. गुरुवारी मात्र संतोषचा मृतदेह तिसगाव येथील खदानीतील एका झाडाला लटकत्या अवस्थेत दिसून आला होता. संतोष बेपत्ता झाल्यावर त्याच्या पत्नीने इरफाण पठाण या इसमावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात इरफानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोषच्या पत्नीचे फोटो एडिट करून इरफान आणि तिचे लग्नापूर्वी संबंध असल्याचे संतोषला दाखवण्यात आल्याने संतोषने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Top 5 News in Aurangabad city, in Marathwada, Maharashtra)

इतर बातम्या- 

Aurangabad Gold: सोनं आजही घसरणीवरच, पाच महिन्यातील निचांकी स्तर गाठला, जाणून घ्या शहरातले भाव

Aurangabad | मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर Raosaheb Danve आणि Abdul Sattar यांची टोलेबाजी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI