मित्राने दिलेला मोबाइल आईच्या हाती, रागाच्या भरात तरुणी गेली तलावावर, दामिनी पथकाच्या समुपदेशनानंतर घरी परतली

मित्राने दिलेला मोबाइल घरात पाहून आई मुलीवर संतापली. रागाच्या भरात मुलगी घरातून निघून गेली. आईने खरच लग्न लावून दिले तर आपले शिक्षण थांबेल, अशी भीती तिला वाटली. त्यामुळे ती थेट हर्सूल तलावावर पोहोचली.

मित्राने दिलेला मोबाइल आईच्या हाती, रागाच्या भरात तरुणी गेली तलावावर, दामिनी पथकाच्या समुपदेशनानंतर घरी परतली
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद: शहरातील 17 वर्षीय मुलीकडे मित्राने दिलेला मोबाइल सापडल्याने मुलीची आई चांगलीच संतापली. आई रागावल्यामुळे नाराज झालेली मुलगी थेट पोहोचली औरंगाबादमधील हर्सूल तलावावर. (Harsul Lake) पण तलावावरील पोलीस आणि दामिनी पथकाला ही मुलगी काही बरं वाईट करण्यासाठीऔरंगाबादमधील  इथे आली असावी, असा संशय आला आणि तो खरा ठरला. पथकाने (Damini Squad, Aurangabad Polilce) या मुलीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि तिचे समुपदेशनही केले.

मित्राने दिलेला मोबाइल लपवून वापरत होती

हर्सूल परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय युवतीची काही दिवसांपूर्वी एका तरुणाशी मैत्री झाली. त्याने तिला मोबाइल घेऊन दिला होता. ही मुलगी घरात असताना मोबाइल लपवून ठेवत होती. मात्र बुधवारी सकाळी घर आवरत असताना आईच्या हाती तो मोबाइल लागला. हा कुणाचा मोबाइल आहे, इथे कसा आला, अशी विचारणा केल्यावर मुलीने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण आईला दाट संशय आला.

थांब तुझं लग्नच लावून देते, या वाक्याने आला राग

मुलीने एवढे दिवस आपल्याला न सांगता घरात मित्राने दिलेला मोबाइल आणला. तो वापरला, हे पाहून या मुलीची आई चांगलीच संतापली. तिने मुलीला या सगळ्याचा जाब विचारला. तसेच तुझे लग्नच लावून देते, असे म्हणत खडसावले. पण यामुळे मुलगी रागाच्या भरात घरातून निघून गेली. आईने खरच लग्न लावून दिले तर आपले शिक्षण थांबेल, अशी भीती तिला वाटली. त्यामुळे ती थेट हर्सूल तलावावर पोहोचली.

तलाव ओसंडून वाहत असल्याने पथक तेथे होते..

गेल्या तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे हर्सूल तलाव ओसंडून वाहत होता. त्यामुळे महापालिकेचे सुरक्षा रक्षक राजेश गवळे, कैलास वाणी तेथेच होते. त्यांना ही तरुणी संशयास्पदरित्या फिरताना दिसली. त्यांनी तत्काळ तिला बाजूला घेतले. तसेच पोलिसांच्या दामिनी पथकाला दामिनी कॉल करून माहिती दिली.

दामिनी पथकाने केले समुपदेशन

महापालिकेच्या पथकाने माहिती देताच दामिनी पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमप, पोलीस नाईक निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, संगीता दांडगे, सुमन पवार यांनी तरुणीची विचारपूस केली. तेव्हा तिने सर्व प्रकार सांगिलता. त्यानंतर पथकाने मुलीच्या आईशी संपर्क साधून तिला त्यांच्या ताब्यात दिले. या तरुणीचे वडील दुसऱ्या शहरात मजुरी करतात तर आईदेखील मजुरी करून घराचा उदरनिर्वाह करते. मुलीला एक भाऊ आणि एक बहीणदेखील आहे. दामिनी पथकाने संपूर्ण कुटुंब व मुलीची समजूत काढली व त्यांना घरी पाठवले.

इतर बातम्या-

Aurangabad Gold: स्वस्तातली संधी, सुवर्णसंधी सोडू नका, सोन्याचे भाव पडले, वाचा औरंगाबादेत काय आहेत दर?

Aurangabad Crime: फरार कुख्यात गुंड शहरात आला, न्यायालयात पोहोचला अन् मग पोलिसांना कानोसा लागला… आता पोलीस कोठडीची मागणी करणार 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI