माझा काका, माझं बालपण…; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला राज ठाकरेंचा खास लेख, आदित्य ठाकरेंच्या पोस्टने शिवसैनिकांचे डोळे पाणावले
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आजपासून प्रारंभ होत आहे. या निमित्ताने षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या भव्य सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या ऐतिहासिक क्षणाकडे लागले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. आजपासून (२३ जानेवारी) बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. या निमित्ताने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात एका खास भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते पुन्हा एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त सध्या मुंबईत, विशेषतः मातोश्री परिसरात जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांनी बाळासाहेबांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार असल्याचा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा लावून धरली आहे. देशात हिंदुत्वाचे बीज रोवणाऱ्या महापुरुषाला भारतरत्न मिळायलाच हवा, असे संजय राऊत यांनी ठामपणे मांडले आहे.
राज ठाकरेंची भावनिक साद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सामनामधील आपल्या विशेष लेखात बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब केशव ठाकरे.. माझा काका… माझं बालपण तरुणपण त्याने व्यापलं होतं. तो माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला….बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे, ज्यामध्ये अग्रलेखापेक्षा जास्त ताकद होती, त्यांच्या या कलेला जागतिक मान्यता मिळाली, पण आपल्या देशात त्यांची योग्य कदर कधी झालीच नाही. खरंतर बाळासाहेब ठाकरे हा विद्यापीठांमधून शिकवण्याचा विषय आहे. पण आपल्याकडे तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आदित्य ठाकरेंचे ‘आजा’ला अभिवादन
शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या आजोबांना अभिवादन केले. “आजा, तुझा आशीर्वाद हीच माझी ताकद आणि ऊर्जा! २०२६-२७ हे जन्मशताब्दी वर्ष आम्हां शिवसैनिकांसोबतच महाराष्ट्रालाही वैचारिक ऊर्जा देणारे ठरेल,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.
आजा, तुझा आशीर्वाद हिच माझी ताकद, हिच माझी ऊर्जा! pic.twitter.com/KYyhJYXRGm
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2026
शिवसैनिकांची अलोट गर्दी
दरम्यान आज सकाळपासूनच दादर येथील शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिकांची अलोट गर्दी होत आहे. निष्ठा आणि श्रद्धेची ही वारी पाहता महानगरपालिकेने या ठिकाणी विशेष व्यवस्था केली आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर होत असलेल्या या पहिल्याच मोठ्या सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
