HIV ची अफवा नि गावाने कुटुंबाला टाकले वाळीत, आरोग्य विभागाचा प्रताप, बीडमध्ये चाललंय काय?
HIV Rumor Beed : मुलीला एचआयव्ही झाल्याची अफवा पसरल्याने बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाला वाळीत टाकल्याची घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील या घटनेनंतर पीडित कुटुंबाने आरोग्य यंत्रणेला धारेवर धरले आहे. तर योग्य कारवाईची मागणी केली आहे.

HIV च्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यातील एका गावात समोर आला आहे. ही अफवा पसरविण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे. पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी या विभागाची तक्रार सुद्धा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुलीचा एचआयव्ही मूळे मृत्यू झाला झाल्याची पोलीस आणि वैद्यकीय अधिकार्याने दिल्याने समाजात बदनामी झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. पीडित कुटुंबाने पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत फोनवर केलेला संवाद देखील समोर आला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा आणि संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे.
कुटुंबाचा आरोप काय?




मुलीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. यामुळे समाजात बदनामी झाल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. या घटनेनंतर गावातील लोकांनी आपल्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचे म्हणणे कुटुंबियांनी केला. गावातील लोकांनी व्यवहार पण थांबवल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या आरोपांमुळे घरातील महिलांनी दोन वेळा जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आम्हाला न्याय हवा
आमची मुलगी गेली पण जवळचे नातेवाईक सुद्धा भेटीला आले नाहीत. या अफवेमुळे कुणीही आता घरी येत नाही. आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिला. सासरकडील मंडळींच्या सांगण्यावरून हा खोटा अहवाल आरोग्य विभागाने दिल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. याविषयीची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तर आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे यांनी असा काही प्रकार आपण सांगितला नसल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार
पीडित कुटुंबाने आता या सर्व प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांविरोधात ही तक्रार दिल्याचे समोर येत आहे. त्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप सुद्धा दिल्याचे समोर येत आहे. ही क्लिप संबंधीत पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचा त्यांचा दावा आहे.