तो बंगला खोक्याचा? पाहा सतीश भोसलेची पत्नी नेमकं काय म्हणाली?
अंजली दमानिया यांनी ट्विटरवर एका बंगल्याचा फोटो पोस्ट केला होता. हा सतीश भोसलेचा बंगाला आहे का असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर आता सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ढाकणे कुटुंबातील व्यक्तींना मारहाण प्रकरणात सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत, या घटनेनंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक केलं. दरम्यान त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सतीश भोसले राहत असलेली जागा ही वनविभागाची असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर वनविभागानं त्याला नोटीस दिली होती, त्याचं घर देखील पाडण्यात आलं. मात्र त्यानंतर त्याच्या घराला अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्यात आली. या घटनेनंतर आरोप- प्रत्यारोपाला उधाण आलं आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तीन दिवसांपूर्वी सतीश उर्फ खोक्याच्या घराला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी वनविभागावर हल्लाबोल केला आहे. सतीश भोसले याचं घर पाडण्याचं कारण काय? जप्ती देखील आणू शकला असता असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्विटरवर एका बंगल्याचा फोटो पोस्ट केला होता. हा सतीश भोसलेचा बंगाला आहे का असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर आता सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाल्या तेजू भोसले?
ते घर आमचे नाही ते माझ्या चुलत दिराचे घर आहे, अशी प्रतिक्रिया सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसले यांनी दिली आहे. अंजली दमानिया यांनी हे घर सतीश भोसलेचे आहे का? असा सवाल करत एक फोटो पोस्ट केला होता, त्यामध्ये दिसणारा बंगला तो आमचा नसून माझ्या चुलत दिराचा आहे. आमच्याकडे असे घर असते तर आम्ही वन विभागाच्या जागेत कशाला राहिलो असतो. उन्हामध्ये लहान लेकरांना घेऊन कशाला बसलो असतो. कपडे भांडे सगळं वन विभागाचे लोक घेऊन गेले आहेत. लोक सांगत आहे ते खोट आहे, आमच्यावर काहीही आरोप लावले जात आहेत, असं तेजू भोसले यांनी म्हटलं आहे.