कल्याण डोबिंवली महापालिकेत कोणाचा महापाैर? हालचालींना वेग, थेट काँग्रेसने..
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापाैर आरक्षण सोडत आहे. आरक्षण जाहीर होण्याला काही मिनिटे शिल्लक असताना महापाैर पदाच्या चालचालींना वेग आला आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबई, कल्याण डोबिंवली आणि उल्हासनगर महापालिकेत महायुतीचा महापाैर बसणार आहे. यासोबतच पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, धुळे या महापालिकेतही धमाकेदार कामगिरी भाजपाची राहिली आहे. ऐन महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ सोडून महापालिका निवडणुका काका शरद पवार यांच्या पक्षासोबत लढल्या. मात्र, तिथेच अजित पवारांना धक्का बसला आणि पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका हातून गेली. आज महापाैर पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. मात्र, त्यापूर्वी अनेकांनी महापाैर पदासाठी फिल्डिंग लावल्याचे बघायला मिळतंय. महापाैर पदावरून सध्या मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. मुंबई महापालिकेवर भाजपाची सत्ता आली असून अनेक महापालिकांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे.
कल्याण डोबिंवली महापालिकेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत लढवली. यादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक कल्याण डोबिंवली महापालिकेत निवडून आले. शिवसेना शिंदे गट एक नंबरचा पक्ष तर दुसऱ्या नंबरचा पक्ष भाजपा ठरला. महापाैर नक्की कोणाचा होणार यावरून विविध चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी भाजपाला अत्यंत मोठा धक्का दिला.
शिवसेना शिंदे गटाने थेट मनसेलासोबत घेतले. मनसेला शिवसेनेने घेतल्याने भाजपाला दूर ठेऊन एकनाथ शिंदे कल्याण डोबिंवली महापालिकेत सत्ता स्थापन करणार का? यावरून चर्चा रंगताना दिसली. शिवाय शिवसेना ठाकरे गटाचेही नगरसेवक नॉटरिचेबल असल्याची माहिती मिळत होती. यादरम्यानच कल्याण डोबिंवली महापालिकेत मोठ्या घडामोडी घडताना सध्या दिसत आहेत.
काँग्रेसने स्वतंत्र गट स्थापन केला आहे. काँग्रेसने कोणासोबतही न जाण्याचा निर्णय घेतला. निवडून आलेले दोन्ही नगरसेवक आमच्यासोबत आणि आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही, असे स्पष्ट शब्दात सांगताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर दिसले. काँग्रेसचे दोन्ही नगरसेवक फुटल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
