उद्धव ठाकरेंचा अजितदादांना मोठा धक्का, ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत शिवसेना शिंदे गटाला देखील मोठा धक्का बसला आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत, पक्षांतराला देखील वेग आला आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, तर काही ठिकाणी अनेक जण आपल्या मित्र पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वाधित फटका हा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसला आहे, कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश मस्के यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली होती, मात्र तरी देखील हे पक्षप्रवेश काही थांबलेले दिसत नाहीतये.
दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेते देखील महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत, विधानसभा निवडूकीनंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये इनकमिंग सुरू झालं होतं, हे इनकमिंग अजूनही सुरूच आहे. निवडणूक जाहीर झाली असताना होणारे पक्षप्रवेश हा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे, मात्र आता राजकारणामध्ये मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटानं राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. हा ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान दुसरीकडे महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व पदाधिकारी भाजपात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे, यावरून आता शिवसेना शिंदे गट देखील चांगलाच आक्रमक बनला आहे. तर रविवारी साताऱ्यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिल्याचं पहायला मिळालं, जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
