महाराष्ट्रात आलेल्या ‘त्या’ पाकिस्तानी कुटुंबाला मोठा दिलासा, ‘या’ कारणामुळे सोडावा लागणार नाही भारत
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान आता जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे, जळगावात 45 दिवसांच्या शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी कुटुंबाला लाँग टर्म व्हिसा मिळाला आहे. लाँग टर्म व्हिसा मिळाल्यामुळे या कुटुंबाला आता भारत सोडून पुन्हा पाकिस्तानला जाण्याची गरज नाहीये, त्यामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
लाँग टर्म व्हिसा मिळाला नसता तर कदाचित या कुटुंबाला पुन्हा पाकिस्तानात जावं लागलं असतं, मात्र वेळीच लाँग टर्म व्हिसा मिळाल्यामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. श्रीचंद दास असं या पाकिस्तानी व्यक्तीचे नाव असून, ते त्यांच्या कुटुंबासह 45 दिवसांचा व्हिसा घेऊन सात दिवसांपूर्वी पाकिस्तानातून जळगावात आले होते.
ते जळगावमध्ये आल्यानंतर पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याची घटना घडली, त्यानंतर जे पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये शॉर्ट टर्म व्हिसावर आलेले आहेत, त्यांनी तातडीनं भारत सोडावा असे आदेश केंद्र सरकारने दिले. याचदरम्यान श्रीचंद दास यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला लाँग टर्म व्हिसा मिळावा यासाठी जळगाव पोलीस प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्यानुसार दास कुटुंबाला भारतात, जळगावात राहण्यासाठीचा पाच वर्षांचा लाँग टर्म व्हिसा देण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आम्ही पाकिस्तानमधून भारतात आलो होतो, पहलगामच्या हल्ल्यानंतर आम्हालाही भारत सोडावा लागेल याची भीती मनात होती, मात्र आता आम्हाला लाँग टर्म व्हिसा मिळाला आहे. त्यामुळे आनंद झाला, आता आम्हाला भारत सोडण्याची गरज नाही, पुन्हा पाकिस्तानला जावं लागणार नाही. अर्ज केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच आम्हाला व्हिसा मिळाला, त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया यावर श्रीचंद दास यांनी दिली आहे. आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आता भारतातच राहणार असून, भारताचं नागरिकत्व मिळावं यासाठी अर्ज करणार असल्याचं सुद्धा दास यांनी यावेळी सांगितलं.