भाजपच्या जागा वाटपात घराणेशाही… नेत्यांची मुलं आणि बायकोला रेडकार्पेट; कुणा कुणाला मिळालं तिकीट?
भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अनेक सध्याचे आमदार पुन्हा उमेदवार आहेत, तर काही नवीन चेहरेही आहेत. या यादीत पक्षातील अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळाली असून, घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही विद्यमान आमदारांना मात्र तिकीट नाकारण्यात आले आहे. पक्षाने 10 नवीन उमेदवारांवर विश्वास ठेवला आहे.
भाजपची 99 उमेदवारांची यादी काल जाहीर झाली. या यादीत बहुतेक विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आलं आहे. काही इच्छुकांनाही तिकीट देण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पक्षाने यंदा तिकीट दिलं आहे. मात्र, काँग्रेसला घराणेशाहीवरून नावे ठेवणाऱ्या भाजपने महाराष्ट्र विधानसभेत मात्र घराणेशाहीला रेड कार्पेट अंथरल्याचं दिसत आहे. पक्षातील नेत्यांची मुलं, मुली आणि पत्नीलाही पक्षाने तिकीट दिलं आहे. आमदार, खासदार आणि मंत्री असलेल्या नेत्यांच्या कुटुंबातच आणखी एक उमेदवारी दिल्याचं दिसून कालच्या यादीवरून उघड झालं आहे.
भाजपने पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण हे भाजपचे राज्यसभेतील उमदेवार आहेत. तर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार आशिष शेलार यांचे बंधू, माजी नगरसेवक विनोद शेलार यांना तिकीट दिलं आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना उमेदवारी देण्यता आली आहे. माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते आणि गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मातीचेच पाय
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे, पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातून संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांचं तिकीट कापून त्यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यपाल हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबात अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तीन आमदारांचा पत्ताकट
भाजपने ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोठा प्लान तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी तीन विद्यमान आमदारांना घरी बसवलं आहे. ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही, अशा आमदारांना घरी बसवलं आहे. पिंपरी चिंचवडच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्या जागी अश्विनी यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. फायरिंग केसमध्ये तुरुंगात असलेले कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचंही तिकीट कापलं आहे. पण त्याऐवजी त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट दिलं आहे.
नव्या चेहऱ्यांवर विश्वास
भाजपने 99 उमेदवारांच्या यादीत 89 जुन्याच चेहऱ्यांनाअ संधी दिली आहे. तर 10 नव्या चेहऱ्यांवर भरोसा टाकला आहे. त्यात प्रतिभा पाचपुते, विनोद शेलार, राजेश बकाने, श्रीजया चव्हाण, शंकर जगताप, विनोद अग्रवाल, अनुराधा चव्हाण, सुलभा गायकवाड, राहुल आवाडे आणि अमोल जावळे आदी नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. तर गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातून कुणालाच उमेदवारी देण्यात आलेली नाही