शिवसेनेत नाराजीचा स्फोट, महापौर भाजपचाच होणार… भाजपच्या माजी आमदाराचा केडीएमसीत हुंकार
KDMC Mayor : राज्यात सध्या आगामी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. अशातच आता केडीएमसीतील महापौरपदावर भाजपने दावा केला आहे, त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे.

राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बार उडालेला असला तरी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांची जय्यत तयारीही सुरू झाली आहे. एकीकडे काँग्रेसने मुंबईत स्वबळावर महापालिका निवडणूक लढण्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेत विस्तवही जाताना दिसत नाहीये. केडीएमसीमध्ये आपलाच महापौर बसवण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चढाओढ होताना दिसत आहे. त्यातच भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी एक विधान करून शिंदे गटाला टेन्शन दिलं आहे.
महापौर भाजपचाच होणार…
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केडीएमसीमध्ये महापौर भाजपचाच होणार असं विधान केलं आहे. पवार म्हणाले की, युती झाली तरी महापौर भाजपचा होणार. पक्षाची ताकद जास्त आहे, आमचे जास्त नगरसेवक निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे. आमची संघटना या ठिकाणी बळकट आहे. कल्याण डोंबिवली संघटनेची बांधणी मजबूत आहे, म्हणून आम्हाला विश्वास व खात्री आमचा महापौर होणार. युतीत लढलो तर महापौर महायुतीचा असेल आणि एकटे लढलो तर आमची ताकद संघटना आहे, त्यामुळे महापौर भाजपचाच होणार.
भाजपमधील इनकमिंग का वाढली?
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत, यावर बोलताना नरेंद्र पवार म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष असल्याने या सर्वांसोबत काम केल्याने फायदा होतो, संघटना मजबूत होतेस सर्व ताकद वार्डाच्या विकासाकरता मिळते. यासाठी सर्व पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी भाजपमध्ये येत आहेत. सन्मानाची वागणूक मिळत नाही काम होत नाही, त्यांचे नेते त्यांचे फोन उचलत नाही त्यामुळे मनसे ,शिवसेना, उबाटा ,काँग्रेससह इतर पक्षातील नाराज कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
महायुतीतील अंतर्गत पक्षांतरावर पवार काय म्हणाले?
महायुतीतीत अंतर्गत होणाऱ्या पक्षांतरावर बोलताना नरेंद्र पवार म्हणाले की, ‘आमचे नाराज पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत जातात व त्यांचे आमच्याकडे येतात. आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी दुसर्या पक्षात जात नाहीत. शिवसेनेतला माणूस बीजेपीत गेला व बीजेपीचा माणूस शिवसेनेत आला तरी हे दोन्ही एकाच घरातले आहेत. महायुतीच्याच घरामध्ये दोन्ही आलेले आणि यामुळे आमची ताकद वाढत आहे. आता युती झाली नाही तर नंतर सत्ता स्थापन आणि त्याचबरोबर विकास निधी आणण्याकरिता आम्ही एकत्र राहणार आहोत.
