Shivsena-BJP : ‘शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे’, निवडणुकाआधीच शिवसेना-भाजप वाद विकोपाला
Shivsena-BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अजून जाहीर झालेला नाही. मात्र, त्याआधीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप आमदारामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. 'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत' अशा पद्धतीची भाषा सुरु आहे.

महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष या दोन आघाड्यांमध्ये आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये तर काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट महाविकास आघाडीमध्ये आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र आहे. ते कुठल्याही आघाडीत नाहीत. महाराष्ट्रात मागच्या तीन-साडेतीन वर्षांपासून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यात महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्ष एकत्रपणे लढणार की, स्वतंत्रपणे ते अजून स्पष्ट नाहीय.
उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालाच, तर स्थानिक पातळीवर मनोमिलनासाठी महायुतीच्या बड्या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील. नंदूरबार जिल्हा याचं एक उदहारण आहे. तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिवसेना आमदारांमधील बेबनाव समोर आला आहे. डॉ. विजयकुमार गावित हे नंदूरबारमधील वजनदार नेते आहेत. सध्या ते भाजपमध्ये आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवलं आहे.
‘माझे फक्त दोनच टार्गेट आहेत’
माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पुन्हा शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत, एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरा आमदार आमश्या पाडवी” डॉ. गावित यांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटाचा वाद विकोपाला पोहोचला आहे. ‘शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे’ असं डॉ. विजयकुमार गावित म्हणाले.
‘आमश्या पाडवी यांच्याकडे बारा बंगले’
“आमश्या पाडवी यांच्याकडे बारा बंगले आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे चार बंगले आहेत, तरी देखील पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभ घेतला आहे. आमदार आमश्या पाडवी यांनी बायको आणि मुलाच्या नावावर शबरी आणि पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे” असा गंभीर आरोप आमदार डॉ गावित यांनी केला आहे.
