भाजपाची सर्वात मोठी कारवाई, बड्या नेत्यासह 32 जणांची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीत खळबळ
BJP : ऐन महापालिका निवडणुकीत भाजपने मोठे पाऊल उचलत अनेक बड्या नेत्यांसह तब्बल 32 जणांचे पक्षातून निलंबन केले आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

संपूर्ण राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. प्रचाराला वेग आला आहे. अनेक ठिकाणी युत्या किंवा आघाड्या झाल्या आहेत, त्यामुळे राजकीय समीकरणं बदललेली आहेत. मात्र या निवडणुकीत अनेक पक्षांना कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केल्याचे समोर आलेले आहे. याचा फटका पक्षांना बसण्याची शक्यता आहे. नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपात मोठी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे आता पक्षाने कठोर भूमिका घेत अनेक बड्या नेत्यांसह तब्बल 32 जणांचे पक्षातून निलंबन केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भाजपाकडून 32 जणांचे निलंबन
नागपूर मधील भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांच्यासह 32 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यामुळे आणि पक्षविरोधी कारवायांमुळे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. यात भाजपचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांचाही समावेश आहे. नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या नेत्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे कारवाई
नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या कारवाईबाबत बोलताना म्हटले की, ‘भारतीय जनता पक्षाचे काही लोक अपक्ष लढत आहेत, काही दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेऊन लढत आहेत, तसेच काही कार्यकर्ते त्यांना समर्थन देत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील 32 लोकांवर निलंबनाची ही कारवाई करण्यात आली आहे. शिस्तभंगासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, 6 वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.’
आमच्या पक्षात शिस्तभंग चालत नाही – दयाशंकर तिवारी
पुढे बोलताना तिवारी म्हणाले की, ‘भाजपा हा अनुशासित पक्ष आहे, इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे. आमच्या पक्षात शिस्तभंग चालत नाही, त्यामुळे आम्ही ही कारवाई केली आहे.’ भाजपच्या नागपुरातील या कारवाईमुळे आता राज्यातील इतर ठिकाणी बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या कारवाईमुळे पक्षाला ऐन निवडणुकीत फटकाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
