लाडकी बहीण योजनेबाबत भाजपने घेतला सर्वात मोठा निर्णय; आता सुविधा केंद्रात जाण्याची गरज नाही, तर…
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. आता लाडकी बहीण योजनेकरिता भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे.
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 1 जुलैपासूनच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिला या विविध तहसील कार्यालयात मोठी गर्दी करताना दिसत आहेत. महिलांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेतमात्र त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसत होते. काही ठिकाणी सर्व्हर बंद झाले तर कुठे आणखी काही अडचणी. त्यामुळे महिला वैतागलेल्या दिसत आहेत.
महिलांची सोय व्हावी म्हणून भाजप कार्यालयाने घेतला पुढाकार
यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगावात लाडकी बहीण योजनेकरिता महिलांची सोय व्हावी म्हणून भाजप कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव शहरातील संपर्क कार्यालयात लाडकी बहिण योजनेकरिता महिलांसाठी सुविधा केंद्र उभारण्यात आलं आहे. जळगावात लाडकी बहिण योजनेची कागदपत्र घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे जळगावात सेतू सुविधा सर्व्हर जाम झाले होते. तसेच शासनाच्या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन झाले आहेत. त्यामुळे महिलांकडून घेतलेली कागदपत्रे अपलोड करण्यासाठी बराच कालावधी लागत होता. दिवसा काम पूर्ण होत नसल्यामुळे रात्रीही अपलोड करण्याचे काम केले गेले. पण तेव्हाही पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याने ते होत नसल्याचे सांगितले जात आहे.
भाजप कार्यालयात उभारलं सुविधा केंद्र
जळगावातील तलाठी कार्यालय , सेतू सुविधा केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी होऊन गैरसोय होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात सुविधा केंद्र उभारण्यात आलं आहे. तेथे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून दिला जात आहे, तसेच वेगवेगळे दाखले देण्याची सुविधाही दिली जात आहे. तसेच यासाठी शासकीय शुल्क व्यतिरिक्त इतर कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसून सुविधा दिल्या जात आहेत. या वेगवेगळ्या सुविधांमुळे मंत्री गिरीश महाजन यांचे संपर्क कार्यालय आता मिनी तहसील कार्यालय बनलं आहे. या कार्यालयात लाडकी बहिण योजनेची संपूर्ण माहिती देणे, अर्ज भरून देण्यासह वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा महिलांना दिल्या जात आहे. त्यामुळे महिलांची गैरसोय टळली असून भाजप कार्यालयात या योजनेची माहिती घेण्यासह सुविधा घेण्यासाठी महिलांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. इतरत्र होणारी गैसोय टाळण्यासाठी महिलांसह विद्यार्थ्यांनी वेगवेगळे दाखले अथवा कागदपत्र काढून घेण्यासाठी भाजप कार्यालयातील सुविधा केंद्राचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.