Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटासाठी वाईट बातमी, आज बसणार आणखी एक मोठा धक्का
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. ठाकरे गटाला कोकणात आज आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. एकनाथ शिंदे यांचं बळ मात्र वाढणार आहे. राज्यात पुढच्या काही महिन्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही चांगली बातमी नाहीय.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत हे सर्व इनकमिंग सुरु आहे. राज्यभरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बऱ्यापैकी यश मिळवलं होतं. त्याचे नऊ तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सात खासदार निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व चित्र पालटलं. विधानसभेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आणि उद्धव ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार निवडून आले. अप्रत्यक्षपणे खरी शिवसेना कोणाकडे? या सुरु असलेल्या चर्चेला उत्तर मिळालं.
आज दापोलीत उध्दव गटाला आणखी मोठा धक्का बसणार आहे. दापोली नगरपालिकेत सुरुवातीला पाच नगरसेवकांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. आत उर्वरित आठ नगरसेवकही धनुष्यबाण हाती घेणार आहेत. उपनगराध्यक्ष खालिद रखांगे आणि शिवानी खानविलकर यांच्यासह सहा नगरसेवकांचा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये दापोलीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
शिवसेनेचा नगराध्यक्ष बसण्याचा मार्ग मोकळा
नगरसेवकांचा एक गट शिवसेनेचा झाल्यामुळे दापोली नगर पंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 17 नगरसेवकांपैकी 14 नगर सेवक शिंदेच्या शिवसेनेकडे आले आहेत. उध्दव गटासह राष्ट्रवादी आणि भाजपकडे आता फक्त एक-एक नगरसेवक उरला आहे.
उद्धव ठाकरे गटाला मोठ खिंडार
काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत मोठ्या संख्येने ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. रत्नागिरीत एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली होती. कोकणात उद्धव ठाकरे गटाला मोठ खिंडार पडलं आहे. आता भास्कर जाधव यांच्या रुपाने कोकणात उद्धव ठाकरे गटाचा फक्त एकमेव आमदार उरला आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
