BMC Election 2026 : सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या BMCचं बजेट किती ?, कशी होते मुंबई महानगरपालिची कमाई ?
15 जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असल्याने सर्वांचे लक्ष बीएमसी निवडणुकीवर असून तिथली सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी केली आहे.

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर 16 जानेवारील मतमोजणी होऊन विजय कोणाचा हे जाहीर होणार आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडे सर्वांचं विशेष लक्ष लागलं आहे. कारण बीएमसी ही देशातील सर्वात जास्त संसाधनांनी समृद्ध महानगरपालिका मानली जाते. 2024-25 याआर्थिक वर्षात, बीएमसीचं बजेट हे दिल्ली आणि बंगळुरू महानगरपालिकांच्या एकत्रित बजेटच्या दुप्पट होते. BMC ची कमाई कुठून होते आणि किती खर्च होतो ते जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2024-25 आर्थिक वर्षासाठी BMCचं बजेट सुमारे 59 हजार 954 कोटी इतकं होतं. तर त्याच वेळी दिल्ली महानगरपालिकेचे (MCD) बजेट16 हजार 683 कोटी आणि बृहत बेंगळुरू महानगरपालिकेचे (BBMP) बजेट होतं 12 हजार 369 कोटी रुपये. तर कोलकाता महानगरपालिकेचे बजेट फक्त5 हजार 166 कोटी होतं. गेल्या 10 वर्षांत, बीएमसीचे बजेट जवळजवळ दुप्पट झालं आहे, जे 2024-25 या आर्थिक वर्षात 51 हजार कोटींच्यावर पोहोचलं आहे. एवढंच नव्हे तर खर्च देखील 2015-16 या आर्थिक वर्षात 20 हाजार 500 कोटी होता तो वाढून या वर्षी 44 हजार 500 कोटी झाला आहे.
कशी होते BMCची कमाई ?
गेल्या दशकात बीएमसीचे उत्पन्न सातत्याने वाढलं आहे. बीएमसीकडे एक मजबूत मुदत ठेवी( फिक्स्ड डिपॉजिट) देखील आहेत, ज्याच्या व्याजाचाही कमाईत समावेश होते. 2024- 25 या आर्थिक वर्षात बीएमसीचे एकूण उत्पन्न 81 हजार 774 कोटी होतं असा अंदाज आहे. विविध सेवांसाठी शुल्क, परवाने आणि वापरकर्ता शुल्क, हे बीएमसीचे उत्पन्नाचे सर्वात मोठे स्रोत आहेत. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडून ग्रांट आणि सबसिडी, कर आणि गुंतवणूक आणि राखीव निधीवरील व्याज याचाही उत्पन्नात वाटा आहे.
करातूनही मिळतो पैसा
2016 ते 2025 दरम्यान, बीएमसीला शुल्क आणि वापरकर्ता शुल्कातून 94 हजार 600 कोटी रुपये मिळाले. यामध्ये रजिस्ट्रेशन शुल्क, ॲडमिशन फी, लेट लायसन्स रिन्यूअल चार्ज, स्विमिंग पूल बुकिंग चार्ज, तोड़फोड़ शुल्क, जाहिरात शुल्क आणि पाणी कनेक्शन फी यासह इतर शुल्कांचा समावेश आहे. याच कालावधीत, बीएमसीला विविध सरकारी योजना आणि इतर सरकारी संस्थांकडून सेवा देण्याऐवजी 86 हजार 700 कोटींची ग्रांट आणि सबसिडी मिळाली. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 2023 -24 या आर्थिक वर्षात, बीएमसीने वांद्रे-कुर्ला रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून 61.7 कोटी रुपये जमा केले. तर आर्थिक वर्ष 2016 ते 2025 दरम्यान, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रस्ते कर, थिएटर टॅक्स, वीज कर, मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) , पाणी कर यासारख्या करांमधून 75 हजार 800 कोटी रुपये कमावले.
रस्ते आणि पुलांवर बीएमसी चा खर्च किती ?
बीएमसीचा सर्वात जास्त खर्च हा रस्ते, पूल, सांडपाणी वाहिन्या, सार्वजनिक आरोग्य सेवा, शिक्षण, सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन यावर होतो. गेल्या 10 वर्षांत, बीएमसीने शहराची देखभाल आणि विकासावर1 लाख 11 हजार 600 कोटी खर्च केले आहेत. या कालावधीत, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, लायब्ररी आणि विविध निधी आणि योजनांना अनुदान म्हणून10 हजार 700 कोटी रुपये देण्यात आले. सार्वजनिक पायाभूत सुविधांचे संचालन आणि देखभालीवर 36 हजार 300 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
तसेच अधिकृत कागदपत्रांनुसार, ऑडिट, विमा, कायदेशीर खर्च, जाहिरात आणि जनसंपर्क, इंधन, प्रवास, मालवाहतूक आणि वाहने यासारख्या प्रशासकीय खर्चावर बीएमसीने 8 हजार 600 कोटी रुपये खर्च केले. एवढंच नव्हे तर बीएमसी सार्वजनिक आरोग्य योजनांवरही मोठ्या प्रमाणात खर्च करते. 2024-25 -२५ या आर्थिक वर्षात, कीटकनाशकांवर आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी 99.5 कोटी रुपये आणि उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 12.8 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
