झेंडावंदन सुरू असतानाच आली चक्कर, मुख्याध्यापकाने शाळेतच सोडला जीव
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे, झेंडावंदनाच्या वेळीच मुख्याध्यापकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देशातील प्रत्येक शाळेत आणि शासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात आज सकाळी झेंडावंदन करण्यात आले. आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशातच आजच्या या महत्त्वाच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे, झेंडावंदनाच्या वेळीच मुख्याध्यापकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मोताळा तालुक्यातील मोहेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
झेंडावंदनावेळी मुख्याध्यापकांचा मृत्यू
आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह ओसंडून वाहत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ध्वजवंदनाचे वेळीच शाळेच्या मुख्याध्यापक दिलीप राठोड यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने शाळेच्या प्रांगणातच कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी झेंडावंदनाच्या वेळी अचानक मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यामुळे उपस्थितांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे गावकरी व विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली आहे.
झेंडावंदनावेळी नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू होती. गावकरी आणि विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक दिलीप राठोड हे ध्वजारोहणासाठी पुढे सरसावले. मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना छातीत वेदना जाणवली व ते जमिनीवर कोसळले. त्यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दिलीप राठोड यांच्या निधनामुळे गावावर शोककळा
दरम्यान, मुख्याध्यापक दिलीप राठोड यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांच्या निधनामुळे मोहेगाव गावातील गावकरी आणि विद्यार्थ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. आजच्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
