Buldhana Crime: शिंदे सेना आणि अजितदादा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भर कार्यक्रमात भिडले, नगरसेवकासह दोन ठार, सात जखमी, नेमकं काय घडलं?
Deulgaon Raja Shinde Sena- Ajit Pawar NCP Clash: बुलडाणा जिल्ह्यातील बालाजीनगरी, देऊळगाव राजा शहरात एकाच समाजाच्या दोन गटात तुफान राडा झाला. शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. यामध्ये नगरसेवकासह दोन जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले.

गणेश सोळंकी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: बुलडाणा जिल्ह्यातील मराठवाड्याला लागून असलेल्या देऊळगाव राजा या तालुक्याच्या ठिकाणी अक्रीत घडलं. शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठले. दोन्ही बाजूने तलवारीसह शस्त्रास्त्रांचा वापर झाला. दोन्ही गटात तुफान राडा झाला. यामध्ये एका नगरसेवकासह कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. जखमींवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या वादाचे कारण तरी काय? कशामुळे घडली ही घटना?
दोन गटात तुफान राडा
देऊळगाव राजा शहरात एकाच समाजाच्या दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंनी तलवारी व इतर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आला. या घटनेत नगरसेवकासह दोन जण जागीच ठार झाले. तर सात जण जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. काल देऊळगाव राजा शहरात एका परिसरात कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात बसण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. पाहता पाहता या वादाचं रूपांतर हाणामारीत झाले. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या अगदी गेटवर हा राडा झाला.
नगरसेवकासह कार्यकर्ता ठार, सात जण जखमी
मृतकात शिंदेच्या शिवसेनेचा विद्यमान नगसेवकाचा समावेश आहे तर दुसरा मृतक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जालना येथे तातडीने हलविण्यात आले आहे.
शेख अनवर शेख अली उर्फ अन्नू माया, नगरसेवक, शिंदे शिवसेना
आसेफ हारून पठाण, अजित पवार गट, कार्यकर्ता
देऊळगाव शहरात एकच खळबळ
दोन्ही गटांमध्ये राडा होऊन परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. दोन्ही बाजूंनी तलवारी आणि इतर शस्त्रांचा सर्रास वापर करण्यात आला. एरव्ही शांत समजल्या जाणाऱ्या आणि धार्मिक नगरी अशी ओळख असलेल्या देऊळगाव राजा शहरात असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या मारहाणीत दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेचा तपास सुरू आहे.