चाणक्य नीतीनुसार ‘या’ तीन प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहा; अन्यथा आयुष्यात वाढू शकतात अडचणी!
चाणक्य नीतीनुसार, काही विशिष्ट व्यक्तींशी संबंध ठेवणे अडचणींचे तसेच त्यांच्या सहवासामुळे दुःख ओढवू शकते. आचार्य चाणक्य अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

आचार्य चाणक्य यांच्याबद्दल कोणाला माहित नाही. चाणक्य हे भारतातील महान अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नीती आजही फॉलो केल्या जातात. त्यांनी त्यांच्या चाणक्य नितीमधून स्वभाव, नातेसंबंध, व्यवहार आणि जीवन जगण्याच्या पद्धतीविषयी अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत. त्यांच्या या नीती फॉलो केल्याने आयुष्यात यशस्वी आणि आनंदी राहण्यासाठी मदत होते. त्यांनी चाणक्य नितीमध्ये काही विशिष्ट व्यक्तींशी संबंध ठेवणे अडचणींचे तसेच त्यांच्या सहवासामुळे दुःख ओढवू शकते असे सांगितले आहे. केवळ चांगल्या लोकांची संगत करणे पुरेसे नाही, तर काही विशिष्ट प्रकारच्या लोकांपासून अंतर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चाणक्य नीतीमध्ये अशाच तीन प्रकारच्या व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला आहे.
१. मूर्ख व्यक्ती आणि अज्ञानी शिष्य
चाणक्य नीतीनुसार, मूर्ख व्यक्तीला कितीही समजावून सांगितले किंवा चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याच्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. अशा व्यक्ती दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी स्वतःचेच म्हणणे खरे मानतात. त्यामुळे त्यांना वारंवार समजावण्यात वेळ आणि ऊर्जा वाया जाऊ शकते. अशा लोकांच्या सहवासामुळे मानसिक त्रासही होण्याची शक्यता असते. त्यामुळे विचारपूर्वक अशा व्यक्तींपासून अंतर राखणे योग्य ठरते.
२. नातेसंबंध बिघडवणारी स्त्री
चाणक्य नीतीतील श्लोकात दुष्ट स्त्रीचा उल्लेख करण्यात आला आहे. येथे व्यक्तीच्या स्वभावाला महत्त्व दिले आहे. कुटुंबात सतत भांडणे लावणे, नात्यांमध्ये कटुता निर्माण करणे, विश्वासघात करणे आणि इतरांना त्रास देणे अशा वर्तनामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. त्यामुळे चाणक्यांच्या विचारानुसार, वाईट स्वभावाच्या आणि नात्यांमध्ये विष कालवणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहणे आवश्यक आहे.
३. सतत दुःखी आणि संकटात असलेले लोक
चाणक्य नीतीनुसार, सतत दुःखात बुडालेल्या आणि संकटांनी घेरलेल्या व्यक्तींच्या सहवासामुळे स्वतःच्या आयुष्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा व्यक्तींच्या समस्या आणि नकारात्मक विचारांमध्ये गुरफटल्यामुळे मानसिक शांतता हरवू शकते, असा या विचाराचा आशय आहे.
चाणक्य नीतीतील महत्त्वाचा संदेश
चाणक्य नीतीतील एका श्लोकात म्हटले आहे, ‘मूर्खाशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च। दुःखिते सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति॥’ या श्लोकाचा आशय असा आहे की, मूर्ख शिष्याला उपदेश करणे, दुष्ट स्वभावाच्या व्यक्तीचे पालनपोषण करणे आणि सतत दुःखात असलेल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे यामुळे ज्ञानी माणसालाही त्रास सहन करावा लागू शकतो.
मात्र, याचा अर्थ संकटात असलेल्या व्यक्तींना मदत करू नये असा नाही. तर इतरांना मदत करताना स्वतःची मानसिक शांतता, वेळ आणि आयुष्य यांचाही विचार करावा, हा या शिकवणीचा व्यापक संदेश मानता येईल.
