सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट चार दिवसापूर्वी झालीच नाही, नेमकी कधी झाली? बावनकुळे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलं. या भेटीवर बोलताना आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. चार दिवसांपूर्वी ही भेट झाल्याचा दावा करण्यात येत होता. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीनंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. आता या भेटीबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुरेश धस आणि मुंडे यांच्यात मतभेदावर चर्चा झाली. माझ्यासमोरच चर्चा झाली, लपून -छपून चर्चा झाली नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
सुरेश धस आणि मुंडे यांच्यात मतभेदावर चर्चा झाली. माझ्यासमोरच चर्चा झाली, लपून -छपून चर्चा झाली नाही. या चर्चेमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे अशी दोघांचीही मागणी होती. त्यांच्यामध्ये मनभेद नाही, मतभेद आहेत. दोघांमध्ये अनेक विषयांवर मतभेद आहेत. महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही, सुख दु:खात असे होत नाही. माझ्यासमोर कुठलीही क्रॉप्रोमाईजची भूमिका घेतली नाही. दोघांनी योग्य भूमिका मांडली. या भेटीला 27 ते 28 दिवस झाले असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
दरम्यान येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागू शकतात, असे संकेत मिळत आहेत. भाजप ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. एखाद्या दोन ठिकाणी उमेदवार तुल्यबळ असतील तर स्थानिक समिकरण बघून निर्णय घेतले जातील. मौत्रीपूर्ण लढत पाहायला मिळू शकते. मात्र ही निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
सध्या महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून तिढा सुरू आहे, यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांंना मागील कामामुळे अनुभव आहे. दादा भुसे यांनाही अनुभव आहे. आम्ही सर्व बसून सामंजस्याने निर्णय घेऊ, नाशिकमध्ये आता कुंभ आहे, त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटले असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.