दम राहिला नाही, सगळी हवा गेली.., भुजबळांनी पुन्हा जरांगे पाटलांना डिवचलं
मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे, त्यांनी अंतरवाली सराटीमधून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती, त्यानंतर त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळाला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकदा उपोषण देखील केलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली असून, येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.
मात्र त्यापूर्वी बोलताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते माढामधील अरण गावामध्ये श्रीफळ दही हंडी सोहळ्याला आले असताना बोलत होते, दरम्यान छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मी थोडी देखील किंमत देत नाही, जरांगे पाटील यांच्यामध्ये काही दम राहिलेला नाही, त्यांची सगळी हवा गेलेली आहे. मराठा समाजाला सरकारने 10 टक्के आरक्षण दिलेलंच आहे, मराठा समाजाला देखील कळून चुकले आहे की, जरांगेंमध्ये आता दम उरला नाही, अशी खोचक टीका यावेळी भुजबळ यांनी केली आहे.
दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांना सांगितलं उमेदवार उभे करायचे आहेत.सर्वांचे फार्म मागितले. मग म्हटले ठरवतो, आणी नंतर सांगितले माघार घेतली. ते फक्त माझ्या मतदार संघात येवल्यामध्ये आले, पण लोकांनी काही त्यांचं ऐकलं नाही, मला चांगल्या मतांनी निवडून दिलं, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.
29 ऑगस्टला मोर्चा
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे, हा मोर्चा पुर्वीच्या मोर्चापेक्षा पाच पट मोठा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मराठा बांधवांचा मोर्चा येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहे.
