चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी, पालकमंत्री उदय सामंतांची माहिती

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 20, 2021 | 9:48 PM

चिपी विमानतळावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळाल्यानंतर आता हे विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे. त्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी, पालकमंत्री उदय सामंतांची माहिती
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Follow us on

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळाल्यानंतर आता हे विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे. त्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना वाद पाहायला मिळाला होता. (Permission from the Directorate General of Civil Aviation to start Chipi Airport)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना चिपी विमानतळ सुरू करण्याचा शब्द कोकणवासियांना दिला होता. कोरोनाकाळात सुद्धा विकास कामाला गती देऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. सिंधुदुर्गवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न या शासनाने प्रत्यक्षात उतरवले आहे. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असं सामंत यांनी यावेळी सांगितलं आहे.

‘500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार’

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी राज्य शासनाने 966 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. 100 विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयाशी सलग्नित 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची 20 एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागास देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) नवी दिल्ली यांचेकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. (MBBS) अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याकरिता यावर्षी मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल, असंही सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

राणेंकडून चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा

केंद्रीय मंत्री नारायण राणे 7 सप्टेंबर रोजी चिपी विमानतळ उद्घाटनाची घोषणा केली. 9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळावरुन विमान वाहतूक सुरु होईल. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्गात हा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी आपण स्वत: आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असतील, अशी माहिती राणे यांनी दिली होती. सात वर्षापासून विमानतळ बांधून तयार होतं. ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटून त्यांची वेळ घेतली. त्यानंतर मी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करत असल्याचं राणे म्हणाले होते. सिंधुदुर्ग, मुंबई आणि अन्य ठिकाणी विमान वाहतूक सुरु होईल असंही राणे यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

राणे, ठाकरेंच्या उपस्थितीत विमानतळाचं उद्घाटन

दरम्यान, चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गरज काय, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यानंतर शिवसेना आणि राणेंमध्ये जोरदार वाद रंगला होता. त्यानंतर भाजपच्या अन्य नेत्यांनी मवाळ भूमिका घेत हा वाद निवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे.

इतर बातम्या :

बारामतीत मोठी दुर्घटना, शेतात काम सुरु असताना अचानक वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू, एक अत्यवस्थ

ग्रामपंचायतीच्या निर्णयानं महाराष्ट्र अवाक, उर्धुळच्या ग्रामपंचायतीचा मजुरांविरोधात ठराव, वाचा नेमकं काय घडलंय?

Permission from the Directorate General of Civil Aviation to start Chipi Airport

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI