Devendra Fadanvis : आमची काँग्रेसशी लढाई पण विलासराव देशमुख.. मुख्यमंत्र्याचं मोठं विधान काय ?
रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या वक्तव्याने लातूरमध्ये गदारोळ झाला. तीव्र प्रतिक्रियेनंतर चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधील सभेत विलासराव देशमुखांचा गौरव करत, चव्हाण यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतल्याचे स्पष्ट केले. त्यांनी लातूरसाठी २२९ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह अनेक विकासकामांची घोषणा केली, ज्यामुळे शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेल.

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्व पक्षांच्या प्रचाराचा, सभांचा धडाका सुरू असून लातूरमधील एका सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे मोठा गदारोळ झाला. विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, असे वक्तव्य चव्हाण यांनी केल्याने प्रचंड खळबळ उडाली. काँग्रेस पक्षासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी, तसेच विलासराव देशमुख यांचे पुत्र यांनीही चव्हाण यांच्या विधानाचा निषेध केला. या वरून वातावरण पेटलेलं असतानाच चव्हाण यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान आज लातूरमध्ये भाजपची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. लातूरच्या भूमीने या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिलं. त्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याही नावाचा समावेश आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याप्रित्यर्थ गौरवोद्गार काढले. तसेच रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
लातूरच्या भूमीने या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिलं. या भूमीत नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील किंवा लातूरला एक वेगळी ओळख दिली, ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील. पक्षाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्य जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यातील एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुख यांचं आहे, हे सांगताना मला इथे कोणताही संकोच नाही. दोन दिवसांपूर्वी इथे काही गोंधळ झाला, कन्फ्युजन झालं. आमचे प्रदेशाध्यक्ष (रविंद्र चव्हाण) इथे आले होते. राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे असं त्यांना सांगायचं होतं. पण कदाचित त्यांचे हे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असतील. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी जाहीरपणे सांगतो काँग्रेस पक्षाशी आमची लढाई असली तरी विलासराव देशमुख यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. या महाराष्ट्रातलं महत्वाचं नेतृत्व म्हणून त्यांचं नावं येतं असं मुख्यमंत्री म्हणाले.
संकटांचं संधीत रुपांतर
मला आजही तो दिवस आठवतो 11 एप्रिल 2016, तेव्हा रेल्वेने लातूरला पाणी आणावं लागलं होतं. त्यावेळी आम्ही ठरवलं की आज रेल्वेने पाणी आणावं लागतंय, पण त्या संकटातून संधीचं रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. पुढल्या काळात लातूरमध्ये पुन्हा कधीच रेल्वेने पाणी आणावं लागू नये या दृष्टीने काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जलयुक्त शिवारपासून ते पिण्याच्या पाण्याच्या योजनेपर्यंत विविध योजनांना आपण चालना दिली. मध्यंतरी सरकार गेल्यानंतर आपण केलेलं नियोजन हे बासनात गुंडाळण्यात आलं अशी टीका फडणवीस यांनी केली. पण चिंतेचं कारण नाही. पुन्हा आपलं सरकार आल्यावर या योजनांना आपण चालना दिली आहे. 259 कोटींची योजना लातूर करता मंजूर केली, त्याचं 22 टक्के कामही पूर्ण झालं आहे. धनेगाव धरणापासून हरंगुळ जलशुद्धी करण केंद्रापर्यंत नवी मुख्य पाईपलाईन असेल, त्यातून पाणीपुरवठा करणार आहोत. आणि महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर याच्या दुसऱ्या मोठ्या टप्प्यालाही मी मान्यता देणार आहे असं आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं.
विरोधकांना टोला
पुढच्या काळात लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही. मला कोणावर टीका करायची नाही, त्यासाठी मी इथे आलो नाही. पण काही लोकांनी अशी वचनं दिली होती की निवडणुकीत निवडून आल्यानंतर 100 दिवसांत पाणी देईन नाहीतर राजीनामा देईन. पण त्यांनी पाणीही दिलं नाही आण राजीनामाही दिला नाही, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला हाणला. मी कोणावर टीका करत नाही, मी फक्त विकासाबद्दल बोलण्यासाठी इथे आलो आहे, असंही फडणवीस म्हणाले.
