Aurangabad Train Mishap | मजुरांनो, धीर सोडू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, औरंगाबादेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख

जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करु नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (CM Uddhav Thackeray on Aurangabad Train Mishap)

Aurangabad Train Mishap | मजुरांनो, धीर सोडू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, औरंगाबादेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख

मुंबई : औरंगाबादजवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. (CM Uddhav Thackeray on Aurangabad Train Mishap)

परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात, यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या दुर्दैवी घटनेसंदर्भात आज सकाळी कळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते. जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरुन गेल्याने 16 जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा : औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?

गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरुप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यात अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित आपापल्या घरी पोहोचतील असे नियोजन झाले आहे. रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करु नका, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले.

परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्या ठिकाणी अगदी शेवटचा मजूर घरी जाईपर्यंत आम्ही त्यांच्या जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करत आहोत. त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका. रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे आणि सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(CM Uddhav Thackeray on Aurangabad Train Mishap)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *