'कोरोना'पासून बचावासाठी गणपती बाप्पालाही मास्क

नाशिकमधील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या 'चांदीच्या गणपती'ला कोरोनापासून बचावासाठी मास्क लावण्यात आला आहे Corona Mask Nashik Ganapati

'कोरोना'पासून बचावासाठी गणपती बाप्पालाही मास्क

नाशिक : थंडी वाढल्यावर गणपती बाप्पाच्या अंगावर स्वेटर-मफलर घालण्याची पद्धत पुणेकरांना नवीन नाही. मात्र ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशकातही अनोखी क्लुप्ती लढवली जात आहे. चक्क गणपती बाप्पाच्या मूर्तीला कापडी मास्क लावण्यात आला आहे. (Corona Mask Nashik Ganapati)

नाशिकमधील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या ‘चांदीच्या गणपती’ला मास्क लावण्यात आला आहे. कोरोना व्हायरसपासून आपल्या लाडक्या बाप्पाचा बचाव करण्यासाठी गणेशभक्तांनी ही काळजी घेतल्याचं दिसत आहे.

‘रविवार कारंजा’चा चांदीचा गणपती अशा अनोख्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. यावेळीही जनजागृती करण्यासाठी बाप्पाला प्रतिकात्मक मास्क लावल्याचा दावा विश्वस्तांनी केला आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. परंतु कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु ‘मास्कधारी’ बाप्पा पाहण्यासाठी गणेशभक्तांच्या रांगा लागल्या नाहीत, म्हणजे झालं!

कोरोनाचा फटका महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांनाही बसला आहे. शिर्डीचं साईबाबा मंदिर, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गर्दी ओसरलेली दिसत आहे. दररोज या देवस्थानांना हजारो भाविक भेट देतात, पण यंदा कोरोनाच्या भीतीने शनिवार-रविवारीही मंदिरातील गर्दी ओसरलेली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने गर्दीच्या ठिकाणी न जमण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. मुंबईत तीन, तर नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एक नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 33 वरुन 38 वर गेली आहे. आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 8 वर पोहोचली आहे.

(Corona Mask Nashik Ganapati)

कोरोनाचे रुग्ण (38)

पिंपरी चिंचवड- 09
मुंबई- 08
पुणे- 07
नागपूर- 04
यवतमाळ- 03
नवी मुंबई- 02
ठाणे- 01
कल्याण- 01
रायगड- 01
अहमदनगर- 01
औरंगाबाद- 01

Corona Mask Nashik Ganapati

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *