Corona : देशातील 11 राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव; महाराष्ट्राला सर्वाधिक धोका
खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालायला सुरुवात करावी. त्याचप्रमाणे सामान्य लोकांनीही अनावश्यकपणे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. वेळोवेळी आपले हात धुवावेत आणि डोळ्यांना, नाकाला वारंवार हात लावणं टाळावं.

कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने आतापर्यंत 257 लोक बाधित झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह 11 राज्ये याने पुन्हा प्रभावित झाली आहेत. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. आरोग्यतज्ज्ञांच्या मते कोरोनाची ही नवीन स्ट्रेन आतापर्यंत जितकी पसरली त्यावरून समजतंय की ती कोविड 19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या म्युटेशन्सइतकी संसर्गजन्य नसू शकते. परंतु इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी अधिक सतर्क राहावं आणि लक्षणं आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोविड डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत (20 मे) देशात कोरोनाचे 257 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये 164 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमागे इतरही आरोग्याची कारणं सांगितली गेली आहेत. मृतांमध्ये 59 वर्षीय पुरुष कर्करोगाने ग्रस्त होता, तर दुसरी मृत 14 वर्षांची मुलगी होती, जी आरोग्याच्या इतर समस्यांनी ग्रस्त होती.
सध्या केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तिथे सक्रिय रुग्णांची संख्या 95 वर पोहोचली आहे. यापैकी 69 प्रकरणं नवीन आहेत. तर तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे सध्या 66 सक्रिय प्रकरणं आहेत. त्यापैकी 34 रुग्ण नवीन आहेत. यानंतर महाराष्ट्रात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 56 आहे. ज्यामध्ये 44 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. नवीन प्रकरणांमध्ये महाराष्ट्र हा तामिळनाडूपेक्षा पुढे आहे.




गुजरातमध्ये कोरोनाचे सात सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. पुद्दुचेरीमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. तिथं सध्या 10 सक्रिय रुग्ण आहेत, तर तीन रुग्ण पूर्णपणे निरोगी असल्याचं घोषित करण्यात आले आहेत. हरियाणामध्येही कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळला आहे. देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन प्रकरणं नवीन आहेत. आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने केंद्र सरकारने 12 मे पासून पुन्हा कोरोना रुग्णांची आकडेवारी अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना देशातील 11 राज्यांमध्ये पसरला आहे. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.