राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय अखेर रद्द
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पुरस्थितीमुळे दिवाळीच्या मुहूर्तावर जाहीर केलेली १० टक्के एसटी भाडेवाढ अखेर रद्द करण्याची घोषणा केली आहे.

राज्यातील पुरस्थितीमुळे शेतकरी उध्वस्त झाला असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी महामंडळाने केलेली १० टक्के भाडेवाढ अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सणासुदीच्या निमित्ताने एसटीने प्रवास करणाऱ्या दिलासा मिळणार आहे. राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली ही १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेवून अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या दहा टक्के भाडेवाढीतून शिवनेरी आणि शिवाई या आराम सेवांना वगळण्यात आले होते. या आरामदायी सेवा वगळता उर्वरित सर्व दर्जाच्या गाड्यांना ही भाडेवाढ लागू झाली असती तर सर्व सामान्य प्रवाशांच्या खिशाला या महागाईत मोठा फटका बसला असता.
मोठा दिलासा मिळणार
दिवाळीच्या १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दरवर्षी प्रमाणे एसटीच्या तिकिट दरात १० टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती, मात्र महाराष्ट्रातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन ही भाडेवाढ रद्द करावी असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचविले होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याने आता सुट्ट्यांचा हंगामात प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला
सणासुदीच्या काळात राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार १० टक्के दरवाढीचा निर्णय महामंडळाने घेतला होता. पण राज्यातील पूरपरिस्थिच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
हंगामी दरवाढही फायद्याची नाही
एसटी महामंडळ सणासुदीत आणि सुट्ट्याच्या हंगामात वाढणारी प्रवासी संख्या गृहीत धरुन हंगामाचा फायदा घेण्यासाठी दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्यात मे महिन्यात हंगामी भाडेवाढ जाहीर करत असतात. त्यामुळे एसटी महामंडळा मोठा फायदा होत असतो. परंतू गेल्या काही काळात हंगामी भाडेवाढ करुनही एसटी महामंडळाला म्हणावा तसा फायदा मिळालेला नाही. कारण एसटीच्या गाड्यांची कमी संख्या, नादुरुस्त गाड्या आणि वाढलेल्या दरामुळे आता प्रवासी खाजगी गाड्यांकडे वळला आहे.
