मुंबई : हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट, अतिवाईट स्तरावर असणाऱ्या दिवसांमध्ये (बॅड एअर डेज) स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांसाठी आरोग्याबाबत इशारा देण्याची यंत्रणा सार्वजनिक स्तरावर सुरू करावी, अशी मागणी राज्यातील विविध नागरी संघटनांनी केलीय. हवेची गुणवत्ता बिघडलेल्या दिवसांमध्ये योग्यवेळी इशारा मिळू शकला, तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकणाऱ्या संवदेनशील समूहांसाठी ते मदतीचं ठरेल, असा उद्देश या मागणीमागे आहे. याबाबत कृती करण्यासाठी हवेची गुणवत्ता खराब असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर अशा हवेची पुरेशी गुणवत्ता न गाठलेली शहरातील (नॉन अटेन्मेंट शहरं) नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. हवेच्या गुणवत्तेबाबतची माहिती फक्त हिवाळ्यातच नव्हे तर एरवीसुद्धा द्यावी, अशीही मागणी याद्वारे केली जात आहे.