उपमुख्यमंत्री अजितदादा होणार माजी गृहमंत्र्यांचे सख्खे शेजारी, अखेर मिळाला हा बंगला
शिंदे सरकारचे यंदा होणारे अधिवेशन हे दुसरे अधिवेश आहे. तर, अजित पवार यांचे शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून पहिले अधिवेशन आहे. त्यामुळे आता सत्तेत सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शासकीय निवासस्थान देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आली होती.

नागपूर : 26 ऑक्टोबर 2023 | राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरु होत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यमंत्रीमंडळ नागपूरमध्ये येणार आहे. त्यामुळे नागपूरमध्ये मंत्र्याचे बंगले, सचिवांचे बंगले, आमदार निवास, अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने यांच्या साफसफाई आणि डागडुजीला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यानी शपथ घेतली. मात्र, त्यांच्यासाठी नागपूरमध्ये अद्याप शासकीय निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. परंतु, आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादा यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नागपूरमध्ये प्रशस्त बंगला शोधलाय.
नागपूर अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांना राहण्यासाठी सिव्हील लाईन्स येथे प्रशस्त बंगले बांधण्यात आले आहेत. सिव्हील लाईन्समध्ये कॅबिनेट मंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्यासाठी रवी भवन येथे बंगले आहेत. तर नाग भवन परिसरात राज्यमंत्री यांच्यासाठी छोटे बंगले राखीव असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात 29 मंत्री आहेत. हे सर्व मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत. तर मंत्रीमंडळातील १४ मंत्री पदे अजून रिक्त आहेत.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी 7 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे सरकारचे यंदा होणारे अधिवेशन हे दुसरे अधिवेश आहे. तर, अजित पवार यांचे शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून पहिले अधिवेशन आहे. त्यामुळे आता सत्तेत सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शासकीय निवासस्थान देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आली होती.
सार्वजनिक बांधकाम खात्याने अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रशस्त बंगला शोधला आहे. नागपूरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील ३१/१ हा बंगला अजित दादा यांना देण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ३१/१ बंगला योग्य असल्याचे अधिकाऱ्यांचे एकमत झाले. त्यामुळे हा बंगला त्यांना देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांच्या बंगल्याजवळच अजित दादा यांचा मुक्काम असणार आहे. ३१/१ हा बंगला सह पोलीस आयुक्तांना देण्यात आला होता. मात्र, आता हा शासकीय बंगला अजित पवार यांच्यासाठी अधिकृत निवासस्थान म्हणून निश्चित करण्यात आला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खाजगी निवासस्थानापासून हा बंगला हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागपूरात दादांचा मुक्काम अनिल देशमुख यांच्या शेजारी असणार आहे.
