अजितदादांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ, घडामोडींना वेग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, धुळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, मात्र आता या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छूक या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा महायुतीमध्ये प्रवेश सुरू असल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेते आणि पदाधिकारी आपल्याच मित्र पक्षात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे. याचा सर्वात मोठा फटका हा महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती, मात्र तरी देखील हे पक्ष प्रवेश सुरूच आहेत. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
धुळ्यातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत रवींद्र देशमुख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान या पक्षप्रवेशामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे, तर दुसरीकडे हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का? याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र आता त्याचं उत्तर मिळालं आहे, या निवडणुका अनेक ठिकाणी स्वबळावर लढवल्या जाणार आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकारण लक्षात घेऊन पक्ष युती, आघाडीचा निर्णय घेत आहेत. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये तर दोन्ही राष्ट्रवादींनी युती केल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी अशाच प्रकारची युती आणि आघाडी पहायाला मिळण्याची शक्यता आहे.
