बसमध्ये पंढरपूरवरुन निघाले वारेकरी, बसमधील चालक-वाहक दारुच्या नशेत, 37 प्रवाशांचा जीव धोक्यात
पंढरपूरवरून अकोट आगाराची बस अकोल्यातील अकोटकडे येत होती. एसटी बसमधील चालक व वाहक दोन्ही दारूच्या नशेत होते. या प्रकारामुळे 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला. त्या दोघांना बीडमध्ये ताब्यात घेण्यात आले.

‘गाव तेथे एसटी’ हे ब्रिदवाक्य घेऊन राज्यातील कानाकोपाऱ्यात धावणारी लालपरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी विश्वासार्ह प्रवास करण्याचे माध्यम आहे. परंतु पंढरपूरवरुन निघालेल्या बसमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी लाखोंच्या संख्येने वारेकरी आले होते. त्यांना पुन्हा गावी नेण्यासाटी एसटी महामंडळाने जादा बसेस देखील सोडल्या. पण एका बसमधील चालक-वाहक दारुच्या नशेत होते. त्या बसमध्ये महिला वारेकरी आणि लहान मुले जास्त होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर एसटी प्रशासन हादरले आहे. एसटी प्रशासनाने त्या दोघांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू केली आहे.
बीडमध्ये दोघांना घेतले ताब्यात
पंढरपूरवरून अकोट आगाराची बस (MH -14-6140) अकोल्यातील अकोटकडे येत होती. या बसमध्ये चालक संतोष रहाटे व वाहक संतोष झाल्टे होते. एसटी बसमधील चालक व वाहक दोन्ही दारूच्या नशेत होते. या प्रकारामुळे 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला. ही गंभीर घटना गुरुवारी रात्री बीड जिल्ह्यात उघड आली. संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस व एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले. आता त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे.
वाहक गाडीत पडला…
पंढरपूरवरुन अकोट बस गुरुवारी दुपारी 4 वाजता निघाली होती. बसमध्ये महिला-पुरुष असे एकूण 37 प्रवासी होते. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश होता. बस निघतानाच चालक व वाहक दारूच्या नशेत असल्याचा संशय प्रवाशांना आला होता. मात्र, बीड ते अंबड मार्गावर रात्री 8 ते 9 च्या सुमारास दोघांवर पूर्णपणे नशा चढल्याचे स्पष्ट झाले. वाहक गाडीतच लोळत पडला होता, तर चालक बस सुरक्षितरीत्या चालवू शकत नव्हता. यामुळे बसमधील महिला व वृद्ध प्रवासी घाबरले. काही प्रवाशांनी आपल्या नातेवाइकांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली.
व्हिडिओ आला समोर
बसमधील एका महिला वारेकरीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, आम्ही महिन्याभरापासून पायी दिंडीत होते. आता घरी निघाला असताना ही बस मिळाली. या बसमधील चालक-वाहक दारुच्या प्रचंड नशेत आहे. आता परिस्थिती अशी आहे की आम्ही बसमधून बाहेर जाऊ शकत नाही. कारण बसमध्ये आम्ही महिला आणि लहान मुलेच जास्त आहे. बाहेर आंधार आहे. पाऊससुद्धा सुरु आहे.
