मोठी बातमी! संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न
संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मध्यरात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Sanjay Shirsat : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांच्या बेडच्या बाजूला पैशांनी भरलेली एक बॅग दिसली होती. असे असतानाच आता त्यांच्या घरावर हल्ला झाल्याची मोठी घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मध्यरात्रीच्या ही घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने शिरसाट यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच त्याने शिरसाट यांच्या घराच्या परिसरात आरडाओरडही केली आहे.
हल्ला करणारा तरुण मद्यधुंद अवस्थेत
सौरभ घुले असे हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार हल्ला करताना हा तरूण मद्यधुंद अवस्थेत होता. ही घटना समोर येताच या तरुणाविरोदात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
एवढे पैसे आलेच कुठून? असा सवाल
दरम्यान, शिरसाट गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ते एका बेडवर बसूनसिगारेट ओढताना दिसत होते. तर त्यांच्या बाजूला एक कुत्राही होता. विशेष म्हणजे याच व्हिडीओमध्ये त्यांच्या खोलीत कथितरित्या पैशांनी भरलेली एक बॅगही दाखण्यात आली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. एवढी सारी रोकड आलीच कुठून असा सवाल उपस्थित केला जात होता.
हा व्हिडीओ मॉर्फ केलाेला, शिरसाट यांचा दावा
व्हायरल व्हिडीओवर शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. हा व्हिडीओ माझ्या घरातील असून बॅगमध्ये पैसे नव्हे तर कपडे होते, असं शिरसाट यांनी सांगितलं होतं. नंतर हा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे, असा दावा त्यांनी केला होता. तसेच मी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावाही करणार आहे, असे ते म्हणाले होते.
