जागावाटपावर फडणवीसांचं ते विधान अन् शिंदेंचं थेट उत्तर; सांगितलं महायुतीत काय घडतंय?
आम्हाला छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक यापैकी एक जागा जागा हवी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उघडपणे सांगितलेले आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde On Seat Sharing : विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीत कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी पक्षाला तीन जागा हव्या आहेत. तर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या दोन जागांवर जागावाटप अडून बसलं आहे. असं असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागावाटपावर भाष्य केलं आहे. फडणवीस यांनी तीन जागांवर चर्चा सुरू असल्याचं सांगितल्यानंतर आता शिंदे यांनी जागावाटपात नेमकं काय सुरू आहे, यावर सविस्तरपणे सांगितलं आहे.
मी मजेत असतो, आनंद घेतो
महायुतीच्या फॉर्म्यूल्यावर एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावरच एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी दिल्लीत आलो की महाराष्ट्रात मी नाराज असल्याची चर्चा होते. मी गावी गेलो की एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होते. पण मी मजेत असतो. मी माझा आनंद घेत असतो. मी कोण कोण नाराज झाले आहेत, कोणाच्या पोटात दुखत आहे हे मी बघत असतो. मी आनंद घेतो या सगळ्याच्या, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी मी नाराज नसल्याचे सांगितले.
पुढच्या एक दोन दिवसात…
पुढे त्यांनी जागावाटपावरही भाष्य केलं. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाचा प्रश्न एक दोन दिवसांत संपेल असे सांगितले. आता मी देखील सांगतो की जवळपास महायुतीचं जागावाटपाचं सूत्र ठरलं आहे. आगामी एक दोन दिवसांत हे सूत्र निश्चित होईल, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच आम्ही महायुतीत म्हणूनच निवडणूक लढवू. या सर्व जागा महायुतीच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या बाबत मनमोकळेपणे निर्णय घेतो
आम्हाला छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक यापैकी एक जागा जागा हवी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उघडपणे सांगितलेले आहे. यावर बोलताना फडणवीस यांनी जे सांगितले आहे त्यावर चर्चा होईल. तो प्रश्नही मिटून जाईल. मी अगोदरपासूनच महायुतीच्या बाबत मनमोकळेपणे निर्णय घेतो. कुठलाही वाद न करता आम्ही समन्वयाने निर्णय घेऊ, असेही शिंदे यांनी स्पष्ट सांगितले. सूत्रांकडून काहीही सांगितले जाते. थोडं थांबा सगळं स्पष्ट होईल, असंही शिंदे म्हणाले.