Eknath Shinde : निवडणूक संपताच एकनाथ शिंदेंचा सर्वात जबर धक्का, शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात खळबळ!
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला. शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांचा या हत्या प्रकरणाशी थेट संबंध आहे, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचा आहे.

Meenakshi Shinde Resigns : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण राज्यात चांगलेच गाजले. दिवंगत प्रदीप पूर्णेकर हे ठाकरे गटाचे ठाण्यातील स्थानिक पदाधिकारी होते. त्यांच्या हत्येनंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला. शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांचा या हत्या प्रकरणाशी थेट संबंध आहे, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचा आहे. याच आरोपानंतर पोलीस चौकशी करत असून मीनाक्षी शिंदे तसेच त्यांच्या पतीची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, आता मीनाक्षी शिंदे यांनी तडकाफडकी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात काय सांगितले?
मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेल आहे. या पत्रात मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, सांगितले आहे. तसेच माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. ‘गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षपातळीवर माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वपक्षीय एकत्रित येऊन माझ्यावर विविध आरोप करत पक्ष नेतृत्वास अर्थात मुख्य नेते व पालकमंत्री म्हणून आपणास वेठीस धरण्याचे जे षडयंत्र चालू आहे हे पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत,’ असं मीनाक्षी शिंदे यांनी पत्राच्या सुरुवातीला सांगितलं आहे.
माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर…
तसेच, मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते, अशा वेदनाही त्यांनी व्यक्त केल्या.
म्हणून मी राजीनामा सुपूर्द करते
ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, ही कल्पनाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे. म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलीय. तसेच माझ्या भावनांची बाजू आपण समजून घ्याल, ही अपेक्षा, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त केलीय.
शिंदे यांची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही
दरम्यान, मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आता ठाण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे आमदार आदित्य ठाकरे हे पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे शिंदे यांची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही, असे म्हणत टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे कार्यकर्तेही जमले आहेत. त्यामुळे आता मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
