Maharashtra Elections 2025 : गुलाल उधळायला यायला लागतंय… चांद्यापासून बांद्यापर्यंत फुल्ल तयारी; नाक्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त
Maharashtra Local Body Elections 2025 : दोन डिसेंबरला 262 नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत. उद्याच्या या मतदानासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे. दोन डिसेंबरला 262 नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी पोहोचत आहेत. तसेच पोलीसांचीही पथके मतदान केंद्राकडे रवाना होताना पहायला मिळत आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत फुल्ल तयारी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रत्नागिरीमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. सात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 200 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड नगरपरिषदेसाठी तर देवरूख, लांजा आणि गुहागर नगरपंचायतीच्या निवडणूक पार पडत आहे. यासाठी 1200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सात नगराध्यक्ष पदासाठी आणि 149 नगरसेवकांच्या जागांसाठी उद्या मतदान होणार आहे.
नागपूर जिल्हा मतदानासाठी सज्ज
नागपूर जिल्ह्यात उद्या 15 नगरपरिषदा आणि 12 नगरपंचायतीत मतदान पार पडणार आहे. एकूण 853 मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे. यासाठी ईव्हीएमसह मतदानाचं साहित्य घेऊन मतदान पथकं आप आपल्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत. एका मतदान पथकात चार कर्मचारी आणि एक पोलीस रक्षकाचा समावेश आहे.
गडचिरोलीत 378 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या तीन ठिकाणी नगरपरिषद निवडणुकीसाठी 105 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यासाठी 117 मतदान पथके रवाना झाली आहेत. उद्या 352 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि 26 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.
करमाळ्यातही तयारी पूर्ण
करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. करमाळा नगरपालिकेसाठी 27 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी 162 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कणकवलीत मतपेट्या मतदान केंद्राकडे रवाना
कणकवली नगरपंचायत निवडणूकसाठी उद्या मतदान होत आहे. यासाठी मतपेट्या मतदान केंद्राकडे रवाना झाल्या आहेत. यावेळी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक निरीक्षक विवेक गोडके यांच्यासह डीवायएसपी घनश्याम आढाव हे मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी खबरदारी घेत आहेत. 8 अधिकारी, 86 अंमलदार, 68 होमगार्ड असे 162 कर्मचारी पोलीस बंदोबसाठी तैनात करण्यात आले आहेत.
वाशीम जिल्ह्यात 4 ठिकाणी मतदान
वाशीम जिल्ह्यातील रिसोड, कारंजा, मंगरुळपीर या तीन नगरपरिषदांसह मालेगाव नगरपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. या चार ठिकाणी अध्यक्ष पदासाठी 27 उमेदवार, तर सदस्य पदासाठी 374 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी 178 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सर्व केंद्रांवर एकूण 961 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी 928 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सांगलीतील निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज
सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आष्टा, उरण ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव, विटा या सहा नगरपरिषद आणि आटपाडी व शिराळ या दोन नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी 49 तर नगरसेवक पदासाठी 514 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात 16 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी उद्या मतदान
जळगाव जिल्ह्यात एकूण 16 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी उद्या मतदानाची प्रकिया पार पडणार आहे. मतदानासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात एकूण 977 मतदान केंद्र असून 8 लाखांपेक्षा जास्त मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेसाठी सात हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
