भाजपात प्रवेश का केला? तेजस्वी घोसाळकरांनी सांगितलं जाहीर कारण, म्हणाल्या अभिषेकला…
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी विकासकामांसाठी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयने लवकर पूर्ण करावा, अशी मागणी केली.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वॉर्ड क्रमांक १ च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचे कारण सांगितले आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजप प्रवेशामागील महत्त्वाचे कारण स्पष्ट केले. माझ्या प्रभागात विकासाची कामे करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. तसेच अभिषेकच्या हत्येप्रकरणी गती येण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला, अशी माहिती तेजस्वी घोसाळकर यांनी दिली.
तेजस्वी घोसाळकर काय म्हणाल्या?
माझ्या प्रभागात विकासाची काम करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत, पण मला ते कसं बोलावं हे समजतं नाही. मला विकासाची काम करायची आहेत आणि माझी ही सर्व काम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होतील, अशी मी अपेक्षा करते, असे तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.
अभिषेकच्या केसला गती देण्यासाठी भाजपात
याशिवाय, त्यांनी आपल्या पतीच्या हत्येच्या प्रकरणावरही भाष्य केले. अभिषेकची जी निर्घृण हत्या झाली, त्याबद्दलही सीबीआयने जो तपास लावलेला आहे, तोही वेगवान पद्धतीने व्हावा. यातून मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. २०१७ साली मी नगरसेविका झाले. अभिषेकला मदत म्हणून राजकारणात प्रवेश केला. प्रभागात विकासाची कामे होत नसल्याने मी हा महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला. ठाकरे कुटुंबाला सोडणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, परंतु अभिषेकची हत्या झाली होती आणि त्यांची केस अजूनही न्यायालयात सुरू आहे. या केसचा निकाल लवकरच लागेल, असे सांगण्यात आले. अभिषेकच्या केसला गती देण्यासाठी आणि प्रभागातील कामे मार्गी लावण्यासाठीच मी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना माझ्यावर कोणताही बाह्य दबाव नव्हता, असे तेजस्वी घोसाळकर यांनी जाहीरपणे म्हटले.
ठाकरे कुटुंब सोडणे खूप कठीण
ज्या पक्षाने ओळख दिली, तो पक्ष आणि ठाकरे कुटुंब सोडणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. तसेच, हा निर्णय घेण्यामागे कोणताही बाह्य दबाव नव्हता. ज्या प्रमाणे मी शिवसेनेत काम करायचे तसेच किंवा त्यापेक्षा जास्त मी भाजपमध्ये काम करेन,” अशी ग्वाही तेजस्वी घोसाळकर यांनी दिली. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
