गिरीश महाजनांचा खतरनाक डाव, भलेभले हैरान, पत्नी साधना महाजनांच्या विजयासाठी नेमकं काय केलं?
भाजपाला जळगावमध्ये मोठे यश आले आहे. येथे मंत्री गिरीश यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या विजयानंतर जामनेगरमध्ये गुलालाची उधळण केली जात असून जल्लोष साजरा केला जात आहे.

Girish Mahajan Wife Sadhana Mahajan : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काही ठिकाणी नगरपंचायत, नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी राजकीय डावपेच आखून बिनविरोध निवडणुका घडवून आणल्या जात आहेत. यावेळच्या निवडणुकीत अनेक बड्या राजकीय नेत्यांनही आपल्या कुटुंबीयांना तिकीट दिले आहे. त्यामुळे काही राजकारण्यांची राजकीय प्रतिष्ठाच पणाला लागली आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी पूर्ण ताकद लावली होती. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून महाजन कुटुंबाचा या निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. त्यामुळे सध्या जामनेरमध्ये महाजन कुटुंबासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा केला जात आहे.
गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना यश
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ही निवडणूक बिनविरोधच व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न केले जात होते. आता महाजन यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. या निवडणुकीतील विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी आज (20 नोव्हेंबर) माघार घेतली आहे. त्यामुळे आता साधना महाजन यांचा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
बिनविरोध निवडून येणाऱ्यांची संख्या वाढली
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. परंतु आता या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली. साधना महाजन यांच्या विजयासह जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी पहिली नगरपालिका ठरली आहे. उज्वला दीपक तायडे, किलुबाई शेवाळे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील, आणि नानाभाऊ बाविस्कर अशी आतापर्यंत बिनविरोध झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने आघाडी घेतली असून 27 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत.
जामनेरमध्ये गुलालाची उधळण
या विजयासह आता जामनेरमध्ये ढोल ताशांच्या गजरात नाचून गुलालाची उधळण केली जात आहे. या विजयानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विकासावर तसेच नेतृत्वावर येथील मतदारांनी विश्वास ठेवला, असे तेथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भाजपाच्या बिनविरोधात निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
फडणवीस यांच्या मामेभावाचा विजय
दुसरीकडे भाजपाचे प्रमुख नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आले आहेत. तेथे काँग्रेस उमेदवार शेख इर्शाद शेख जमील तसेच नथ्थू खडके नामदेव खडके यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. तशी माहिती आमदार रवी राणा यानी दिली. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना फोनच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
