सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलकांसाठी गूड न्यूज, आजचा मुक्कामही…
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. याआधी या आंदोलनासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र आता आणखी एका दिवसासाठी आंदोलनाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. याआधी या आंदोलनासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र आता आणखी एका दिवसासाठी आंदोलनाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आज रात्री मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक हे आझाद मैदान परिसरात मुक्कामी असणार आहेत.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आधी केवळ एका दिवसासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्याचबरोबर जरांगे पाटलांनी आंदोलनासाठी वाढीव मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे. या काळात सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचेही बोलले जात आहे.
गुणरत्न सदावर्तेंचा आंदोलनाला विरोध
कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरागेंच्या आंदोलनाला विरोध केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी याआधी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सदावर्ते यांनी कायद्याचा आधार घेत जरांगे यांच्याविरोधात दंड थोपडले आहेत. जरांगे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे सदावर्ते यांनी जरांगे यांच्याविरोदात ऑनलाईन पद्धतीने एक तक्रारही दाखल केली आहे.
राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
आझाद मैदानात 5000 लोकांपेक्षा जास्त गर्दी झालेली आहे. अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि रस्ता रोको झालेले आहे. सर्वसामान्य नागरिकाचे हाल होत आहेत, असा आरोपही सदावर्ते यांनी केला. तसेच मनोज जरंगे यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय जाधव , विजयसिंह पंडित, ओमराजे निंबाळकर, बजरंग सोनवणे यांच्यासह आंदोलनाला राजकीय समर्थन देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.
