मनोज जरांगे पाटलांसोबत सरकारची चर्चा नाहीच? मोठी बातमी समोर
सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं, मात्र आता या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. विखे पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत, ते 29 ऑगस्टाला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो मराठा बांधव देखील मुंबईच्या दिशेन निघाले आहेत. दरम्यान अशी बातमी समोर आली होती, की सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांचा सामवेश असणार आहे.
मात्र या संदर्भात बोलताना आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. उदय सामंत आणि माझ्यातही त्याबाबत काही बोलणं झालेले नाही, असं यावेळी विखे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे, त्यांची तयारी असेल तर आम्ही देखील तयार आहोत, मात्र त्यासाठी दोन्हीही बाजूने समन्वय झाला पाहिजे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत जरांगे पाटलांनी निर्णय घ्यायचा आहे, शासनाची यात कुठलीही भूमिका नाही, सरकारने यापूर्वीही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नव्हता आणि आताही नाही, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं
29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणार आहेत, या पार्श्वभूमीवर मराठा बांधवाचा मोर्चा अंतरवाली सराटीहून आज मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे. या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास हाय कोर्टाकडून मनाई करण्यात आली होती, परंतु आता त्यांंना एक दिवसांची परवानगी मिळाली आहे. आम्ही सरकारच्या सर्व अटींचं पालन करू मात्र उपोषण बेमुदतच करणार असं यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 29 ऑगस्ट रोजी हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे.
