‘हैदर, अकबर, निजाम अरे भाई जरांगे…’, पाटलांच्या उपोषणावर सदावर्तेंची जळजळीत टीका
आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे, या उपोषणावर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लाढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
मनोज जरांगे पाटील म्हणजे एक स्टंटबाज आहे. त्यांचं आंदोलन बिनबुडाचं आहे. हे आंदोलन म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांच्यात धावण्याची स्पर्धा आहे. प्राथमिक शाळेत धावण्याची जी स्पर्धा असतेना तशी ही स्पर्धा आहे. या आंदोलनाला राजकीय म्हणण्यापेक्षा समाजाचा नेता कोण? हे दर्शवणारं हे आंदोलन आहे. सुरेश धस असो की मनोज जरांगे पाटील हे दोन्ही पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहे. ते लोकांची दिशाभूल करत आहेत. मराठा भावांना हे माहिती झालेलं आहे की, आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये 50 टक्क्यांच्या वर देता येत नाही. ‘हैदर, अकबर, निजाम अरे भाई जरांगे आणखी काही लोकांना बोल, विचार करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल’ असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, एका विशिष्ट हेतूनं हे सर्व काही सुरू आहे. स्वत:ची इमेज तयार करणे किंवा माया मिळवणं याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांचं केविलवाणं आंदोलन सुरू आहे. खरे जातीवादी कोण आहेत? हे सुरेश धस यांच्या वर्तनावरून आणि जरांगे पाटील यांच्या कार्यप्रणालीवरून आता महाराष्ट्राला समजले आहे, असंही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, आता मनोज जरांगे पाटील या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
