घरातून बाहेर पडले अन् अडकले, मध्य, हर्बर रेल्वे उशिराने तर वांद्रे – सीएसएमटी सेवा ठप्प; पहिल्याच पावसात मुंबईकरांना फटका
मुंबईत मे महिन्याच्या अखेरीसच सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रेल्वे सेवांना मोठा फटका बसला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे उशिराने धावत असून, काही मार्गांवर लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. पाणी साचल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि ऑफिसला जाणाऱ्यांना लेटमार्कची भीती निर्माण झाली आहे. मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

आगीतून निघालो आणि फुफाट्यात पडलो, ही म्हण आपण आजपर्यंत ऐकत आलो आहोत. पण घरातून निघालो अन् रेल्वेत अडकलो, अशी अवस्था आज मुंबईकरांची झाली आहे. मे महिन्यातच सुरू झालेल्या पावसाने पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई केली. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हर्बर रेल्वे 20 ते 30 मिनिटाने उशिराने धावत आहे. तर सीएसएमटी ते वांद्रे लोकल ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. शिवाय ऑफिसात लेटमार्क लागल्याने अनेक मुंबईकर वैतागले आहेत.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यातून, चिकचिकीतून दिलासा मिळाल्याने मुंबईकर सुखावले खरे. पण आज सकाळपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या रेल्वे मार्गांवरही पाणी साचलं असून मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवांवर त्याच परिणाम होत लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मस्जिद स्थानकावर पाणी साचल्यामुळे सकाळी 10:25 वाजेपासून वांद्रे – सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा बंद झाली आहे. तर मध्य रेल्वेही 15 ते 20 मिनिटे लेट आहे. चुनाभट्टी आणि सायन दरम्यान पाणी भरल्याने मध्य रेल्वेचा नेहमीप्रमाणे खोळंबा झाला आहे.

मुंबईत जोरदार सुरू असलेल्या पावसाचा फटका विरारहून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकलला बसला आहे. आज सकाळपासूनच लोकल सेवा 15-20 मिनिटे उशीराने सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल उशिराने धावत असल्याने ऑफीसला निघालेल्या लोकांचे मात्र मोठे हाल सुरू आहेत.
मुंबईत कुठे काय परिस्थिती ?
– ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल 40 मिनिटे उशिराने धावत आहे. तर ठाण्याहू कल्याणच्या दिशेने जाणारी जलद आणि धीमी लोकल 15 मिनिटे उशिराने धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काही इंडिकेटर बंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे गाड्या उशिरा धावत आहे, अशा प्रकारे सूचना रेल्वेकडून देण्यात येत आहे.
– गांधी मार्केट येथे पाणी भरल्यामुळे दोन्ही दिशेतील बसगाड्या भाऊ दाजी मार्गाने परावर्तित करण्यात आलेल्या आहेत.
– सायन रोड नंबर 24 पाणी भरल्यामुळे मार्ग क्रमांक 341 व 312 या अप दिशेतील बसगाड्या सायन मेन रोड चा सिग्नल येथून डावी कडे वळण घेऊन u टर्न घेतील व पूर्ववत मार्गस्त होतील.
– वडाळा उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याने 9.00 वाजल्यापासून बस मार्ग क्रमांक 117 व 174 च्या बस गाड्या वडाळा चर्चमार्गे परावर्तित करण्यात आले आहेत.
– हिंदमाता येथे पाणी साचल्याने 9.30 वाजल्यापासून बस मार्ग क्रमांक 40, 212, 368 या दोन्ही दिशेमध्ये शारदा सिनेमा कडूनपरावर्तित करण्यात आले आहे
