Ramrao Vadkute: भाजप खासदार रामराव वडकुते यांचे निधन, मंगळवारी हिंगोलीत अंत्यसंस्कार, ओबीसी समाजाचा चेहरा हरवला
BJP MP Ramrao Sakharam Vadkute Passes away: दिल्लीत उपचारादरम्यान भाजप खासदार रामराव वडकुते यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मंगळवारी हिंगोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

BJP MP Ramrao Sakharam Vadkute Passes away: भाजपचे राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांची उपचारादरम्यान दिल्लीत प्राणज्योत मालवली. दिल्लीतील एम्स रूग्णालयात वडकुते यांनी 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्रास जाणवत असल्याने ते स्वतः रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. सात महिन्यांपूर्वीच त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. हिंगोली आणि मराठवाड्यातील ओबीसी चळवळीचे ते चेहरा होते.मराठवाड्यातील धनगर आणि ओबीसी चेहरा म्हणून भाजपने त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली होती. मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातून त्यांचा नावाची घोषणा झाली होती. त्यांच्यावर मंगळवारी हिंगोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रामराव वडकुते यांच्यावर मंगळवारी होणार अंत्यसंस्कार
23 नोव्हेंबर सोमवारी सकाळी संभाजीनगर येथे त्यांच पार्थिव दाखल होणार आहे. तिथून परभणी येथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव नेले जाणार आहे . उद्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत परभणी मध्ये ठेवले जाणार आहे. त्या नंतर रामराव वडकुते यांच पार्थिव उद्या सायंकाळी हिंगोली येथील निवासस्थानी दाखल होणार. पार्थिव अंत्यदर्शनासाठी रात्रभर ठेवले जाणार आहे. मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरातील महाकाली नगर हिंगोली येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रामराव वडकुते यांच्या अंत्यविधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहण्याची शक्यता आहे.
सामाजिक, राजकीय क्षेत्राची हानी -पालकमंत्री नरहरी झिरवळ
राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दांत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या. मंत्री झिरवाळ म्हणाले, खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारे आहे.तसेच ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांसह सर्व आप्तस्वकीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना मंत्री झिरवाळ यांनी केली.
राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन समाजाचा बुलंद आवाज हरपला
राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारे आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आपल्या कर्तृत्वाच्या आणि संघर्षाच्या बळावर तळागाळातून देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचलेले नेतृत्व आज हरपले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक तसेच बहुजन समाजाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
