मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे मौन सोडणार; ट्विटरवरुन घोषणा

मराठा नेत्यांनी राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढायला सुरुवात झाली आहे | sambhaji raje Maratha Reservation

मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे मौन सोडणार; ट्विटरवरुन घोषणा
संभाजीराजे छत्रपती

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापायला लागले असतानाच आता छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे आरक्षणासाठी सामोपचाराची का सरकारविरुद्ध एल्गार करण्याची भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (chhatrapati sambhaji raje will soon clear his stand about Maratha Reservation)

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्दबादल ठरवले होते. न्यायालयाच्या निकालानंतर तात्काळ प्रतिक्रिया देतेवेळी संभाजीराजे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली होती. केंद्र व राज्य सरकार दोघांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्य सरकारने प्रयत्नांमध्ये कुठेही कसर ठेवली नाही. त्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने मिळून यावर मार्ग काढावा, असे संभाजीराजे यांनी सुचविले होते.

मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण सातत्याने तापताना दिसत आहे. मराठा नेत्यांनी राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढायला सुरुवात झाली आहे. अशावेळी छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मराठा मोर्चेकऱ्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यभरात होऊ घातलेल्या आंदोलनांबाबत (Maratha Morcha) भाजपने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे (BJP) कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पत्रक काढून यासंदर्भातील घोषणा केली होती.

मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल. महाविकासआघाडी सरकार मराठा समाजाचा प्रक्षोभ दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजप हा डाव हाणून पाडेल, असे भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या: 

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, छत्रपती संभाजीराजे म्हणतात, आता ठाकरे सरकारनं ‘हे’ करावं!

”मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा अनाजीपंती ‘कात्रज’ दाखवण्याचा भाजपाचा कावेबाज डाव”

…तर मी माझी खासदारकी फेकून देतो, संभाजीराजे आक्रमक

(chhatrapati sambhaji raje will soon clear his stand about Maratha Reservation)