Ajit Pawar : ‘वेडेवाकडे प्रकार सहन करणार नाही’, बीडमध्ये अजितदादांनी ठणकावून सांगितलं
"महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. पाच वर्ष आपल्या हातात आहेत. आपल्याला चांगल्या प्रकारे काम करायचं आहे. बीड विषयी वेगवेळ्या बातम्या पेपरमध्ये वाचत असतो. जिथे तथ्य असेल, तिथे संबंधितांवर कारवाई केली जाईल. पण जिथे तथ्य नाही, तिथे कारवाईचा प्रश्न नाही" असं अजित पवार म्हणाले.

“बीड शहरात मतमोजणीत सुरुवातीला पुढे होते. पण नंतर मागे पडलो जागा गमावली. बाकी पाच ठिकाणी महायुतीच्या जागा निवडून आल्या. त्या भागातील महायुतीच कार्यकर्त्यांच, मतदारांच मनापासून अभिनंदन करतो. शहरात अपयश आलं असलं, तरी अपयशाने खचून जाऊ नका. नव्या उमेदीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं काम करता येईल, लोकांचा विश्वास कसा संपादन करता येईल, त्यासाठी प्रयत्न करा” असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत. बीडचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीची ते बैठक घेणार आहेत.
“एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सेक्युलर विचारधारेची भूमिका आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची जी जडण-घडण केली आहे, संस्कृत महाराष्ट्र कसा असावा, वैचारीक बैठक महाराष्ट्राची कशा असावी, महाराष्ट्रात सत्ताधारी लोकांनी कसं काम करावं, याचा आदर्श हा उभ्या देशाला, महाराष्ट्राला चव्हाण साहेबांनी घालून दिला. त्याच मार्गाने पुढे जाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे” असं अजित पवार म्हणाले.
माझ्या कामाची पद्धत वेगळी
“इथे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, वेगवेगळ्या सेलचे प्रमुख उपस्थित आहेत. बाबांनो, माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. कुठलीही काम मंजूर झाली, तर ती काम दर्जेदार असली पाहिजेत. कुठलेही वेडेवाकडे प्रकार झाले, तर ते सहन करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जवळचा, लांबचा हे बघणार नाही. हा जनतेचा पैसा आहे” असं अजित पवार म्हणाले.
जनतेचा पैसा सत्करणी लागला पाहिजे
“आत्ताच काही सहकाऱ्यांना सांगितलं, जनतेचा पैसा सत्करणी लागला पाहिजे. त्यात कुठलीही गडबड होता कामा नये. कारण मर्यादीत प्रमाणात पैसा मिळतो. केंद्रातून निधी कसा आणता येईल, त्यासाठी प्रयत्न करु. डीपीडीसीच्या माध्यमातून सर्वसामान्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, त्यासाठी प्रयत्न करु. तुमच्याकडून कुठलीही चूक होता कामा नये” असं अजित पवार म्हणाले.
