IMD weather update : महाराष्ट्रावर आता पुन्हा मोठं संकट, धोका वाढला, आयएमडीकडून 14 जिल्ह्यांना मोठा इशारा
महाराष्ट्रात यंदा पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला, पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्रात यंदा पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला होता, पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं. अतिवृष्टीचा मोठा तडाखा महाराष्ट्राला बसला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून गेला, तर काही ठिकाणी नद्यांना आलेल्या पुराचं पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे घरादारासहीत पशुधन देखील वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला. मोसमी पावसासोबतच अवकाळी पावसाचं प्रमाण देखील अधिक राहिल्याचं पहायला मिळालं. यंदा देशासह राज्यात मान्सूनने वेळेपूर्वीच एन्ट्री केली होती. दरम्यान आता पावसाचा धोका टळला आहे, मात्र पुन्हा एकदा एक मोठं संकट राज्यावर येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज?
महाराष्ट्रात पुढील 2 दिवसांमध्ये सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे. उत्तरेकडील थंड वारे वेगाने वाहत असल्याने पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यातील 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी माहिती दिली.
थंडीचा परिणाम कोणत्या जिल्ह्यावर होणार?
मराठवाडा -जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर जिल्हा
विदर्भ – गोंदिया, नागपूर
उत्तर महाराष्ट्र – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर
पश्चिम महाराष्ट्र – पुणे, सोलापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून थंडीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सतर्कतेचं आवाहन
दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडका वाढणार आहे, उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमान घसरणार आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे. ज्या लोकांना श्वासनाचा त्रास आहे, अशा लोकांनी विशेष काळजी घ्यावी असं हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रासोबतच उत्तर भारतात देखील थंडीचा कडका आता वाढणार आहे. पुढील काही दिवस तापमानात चांगलीच घट होणार असून थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र गारठण्याची शक्यता आहे.
