इम्तियाझ जलील आणि माझी लढाई होणार, गायकवाड यांचा स्टॅम्प पेपरवर करारनामा
कँटीनमधल्या मारहाणीनंतर जलील यांनी मला मारणार असल्याचे सांगितले आहे.बुलढाण्यातल्या सभेत जलील यांनी मला मारण्याचे म्हटले होते. त्यानुसार हा करारनामा केला असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

आमदार कॅण्टीनमध्ये शिळे वरण मिळाल्याने चालकाला टॉवेलवर येऊन मारहाण करणारे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी आपली लढाई होणार आहे असा करारनामा स्टॅम्प पेपरवर लिहून देत आणखी नवा वाद निर्माण केला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मी जर कॅण्टीन चालक असतो तर संजय गायकवाड यांना चांगली अद्दल घडवली असते अशी टीका केली होती. आता यावर संजय गायकवाड यांनी उत्तर दिले आहे.
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्यानंतर संतापलेल्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी या कॅण्टीन चालकाला बेदम मारहाण केली होती. त्यांनी टॉवेलवर येऊन कॅण्टीन चालकाला ठोसे लगावतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर कॅण्टीन चालकावर देखील कारवाई होत त्याचा परवना रद्द झाला होता. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मी जर त्या कॅण्टीन चालकाच्या जागी असतो तर संजय गायकवाड यांची धुलाई केली असते असे वक्तव्य केले होते. त्यानंतर संजय गायकवाड यांनी कॅण्टीन मालक जरी जलील असते तर त्यांनाही चोपले असते असे वक्तव्य केले होते. त्यानंतर जग तेरी, दिन तेरा, वक्त भी तेरा आजा कहा लढना हे असा प्रति आव्हान जलील यांनी दिले होते.
जबाबदारी आमच्या दोघांची
आता माजी खासदार इम्तियाज जलील यांचे आव्हान स्वीकारत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून दिला आहे. त्यात त्यांनी जलील आणि माझ्या लढाई होईल. यात दगड धोंडे, वा इतर शस्रांचा वापर होणार नाही अशीही हमी गायकवाड यांनी लिहून दिली आहे. आमच्या लढाईत तिसरा येणार नाही जे काही होईल याची दक्षता पोलीस घेतील असेही त्यांनी म्हटले आहे. या लढाईत काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.या लढाईची तारीख, वेळ आणि स्थळ जलील यांनी ठरवावे असेही आव्हान गायकवाड यांनी दिले आहे.
