मुंबई : कोरोना (Corona) विषाणुचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या (10th examination) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र, उपकेंद्र या पद्धतीने नियोजन करण्यात आले असून, इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची, उपकेंद्रांची संख्या 9613 तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची, उपकेंद्रांची संख्या 21349 इतकी असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय शिक्षण विभागाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन देखील वर्षा गायकवाड यांनी केले आहे. तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळूनच परीक्षा घेतल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.