20 पैकी 20 देशांचा 12 किल्ल्यांना कौल, युनेस्कोत काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली इन्साईड स्टोरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवप्रेमींचे अभिनंदन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली होती. आता त्यांनी पत्रकार परिषद घेत ‘हा शिवप्रेमींचा विजय आहे’ असे म्हटले आहे.
“मोदींकडे देशभरातून ७ वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या”
या किल्ल्यांची निवड कशी झाली याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्यासाठी नॉमिनेट केले होते. मोदींकडे देशभरातून ७ वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या. ज्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून नॉमिनेट करण्यासाठी पंतप्रधानांसमोर ठेवलं होतं. पण त्यापैकी मोदींनी जागतिक वारसा स्थळ म्हणून शिवाजी महाराजांचे १२ किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला. यातील जिंजीचा किल्ला हा तामिळनाडूत आहे.’
वाचा: पाच वर्षात 13 पटींनी संपत्ती वाढवणारे मंत्री संजय शिरसाट किती कोटींचे मालक?
’20 देशांनी केले भारताला नॉमिनेट’
पुढे ते म्हणाले, या १२ किल्ल्याबाबतचं जे स्थापत्य आहे, वेस्टर्न घाट, समुद्र, जंगल अशा नैसर्गिक विविधतेत हे स्थापत्य तयार करण्यात आले, दरवाजे दिसत नाही असे तयार करण्यात आले. अशा सर्व गोष्टी युनेस्को समोर ठेवल्या. वर्षभर त्यांचं डेलिगेशन आलं. त्यांनी व्हिजिट केली. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात एक डेलिगेशन युनेस्कोत गेलं. टेक्निकल सादरीकरण केलं. एकूण २० देश सदस्य, त्यांना मतदानाचा अधिकार. त्यांच्या दुतावासांसोबत मीही बोललो. परराष्ट्र मंत्रीही बोलले. आम्ही मोदींनाही भेटलो. तुम्ही नॉमिनेशन केले. मतदानाची प्रक्रिया आहे. २० देश आहेत. भारत सरकारने पुढाकार घ्या असं सांगितलं. त्या त्या देशाच्या सरकारशी चर्चा केली.’
आपले परमनंट मेंबर शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली. ते आणि आपले अप्पर मुख्य सचिव खारगे तिथे उपस्थित होते. २० देशांनी आपल्या बाजूने मतदान केलं. एकमताने हे किल्ले जागतिक वारसा केंद्र आहे, हे घोषित केलं. हा शिवप्रेमींचा विजय आहे. सर्व देशाच्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि स्ट्रॅटेजी वापरली त्याचं कौतुक केलं. किती पुढचा विचार यात केला होता याचं अनेकांना आश्चर्य वाटलं. आपले किल्ले वर्ल्ड मॅपवर आले आहेत. युनेस्कोच्या संकेत स्थळावर याची माहिती जाईल. वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
