इंडिगोचा अजब कारभार, प्रवाशांना जायचं होतं पुण्याला पोहोचवलं हैदराबादला
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, नागपूरच्या प्रवाशांना इंडिगोच्या विमानानं पुण्याला जायचं होतं, मात्र या विमानाने प्रवाशांना थेट हैदराबादला पोहोचवलं आहे. यामुळे प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला.

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, पुण्याला जाण्यासाठी नागपुरातून प्रवासी विमानात बसले, मात्र त्यानंतर ते थेट हैदराबादला पोहोचले आहेत. या प्रवाशांना इंडिगोच्या विमानानं पुण्याला जायचं होतं, मात्र त्यांना हैदराबादला पोहोचवण्यात आलं. विशेष म्हणजे जेव्हा विमान हैदराबादला पोहोचलं, तेव्हा तिथे देखील त्यांना तब्बल एक तास विमानाच्या बाहेर येऊच दिलं नाही, झालेल्या घटनेमुळे या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी विमानातच गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रवाशांनी विमानात गोंधळ सुरू केल्यामुळे अखेर या प्रवाशांना विमानातून बाहेर सोडण्यात आलं, नागपुरहून पुण्याला निघालेले अनेक प्रवासी अजूनही हैदरबाद विमानतळावरच अडकून पडले आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार नागपूरातील प्रवाशांना इंडिगोच्या विमानाने पुण्याला जायचे होते. मात्र इंडिगोने गुरुवारी प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी नागपूर – पुणे अशी इंडिगोची फ्लाईट नियोजित होती. मात्र ती फ्लाईट एक वाजेपर्यंत नागपुरातून उडालीच नाही, त्यानंतर रात्री एक वाजता फ्लाईटने उड्डाण घेतले. मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगोच्या पायलटने आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्या ऐवजी हैदराबादला लँड केली.
हे विमान हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही. अखेरीस काही प्रवाशांनी विमानाच्या आत गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना हैदराबाद टर्मिनल्सवर विमानातून बाहेर सोडण्यात आले. अजूनही नागपूरचे अनेक प्रवासी जे पुण्याला जायला निघाले होते, ते हैदराबादमध्येच अडकून पडले आहेत. नागपूरातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाराणसीवरून पुण्याला जाण्यासाठी निघालेले देखील अनेक प्रवासी सध्या हैदराबादमध्ये अडकून पडले आहेत. हैदराबाद विमानतळावर प्रचंड हाल होत असल्याची तक्रार या प्रवाशांनी केली आहे.
