Manoj Jarange : कुणाचं रक्त सांडलं तर… मराठ्यांसमोर पोटतिडकीने बोलता, बोलता मनोज जरांगे पाटील रडले
Manoj Jarange Patil Appeal: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई मोर्चाचा मार्ग जाहीर केला. समाजाला मार्गदर्शन करताना नेता मोठा नसतो तर समाज मोठा असल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. यावेळी त्यांनी मोठे आवाहन केले.

Manoj Jarange Patil Appeal: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून मराठा समाजाला मुंबई आंदोलनाची हाक दिली. राज्यव्यापी बैठकीनंतर त्यांनी समाजाला मोठे आवाहन केले. त्यांनी मुंबईत जाण्याचा आणि मुक्कामाच्या ठिकाणाची माहिती दिली. त्याचवेळी मराठा आरक्षणावर मार्गदर्शन करताना त्यांना हुंदका आवरता आला नाही. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळले. जरांगे पाटील समाजाशी संवाद साधताना रडले. त्यावेळी वातावरण शांत झाले होते. अनेक उपस्थितांचे मन गहिवरले. अनेकांचे डोळे पाणावले.
उद्या मी असेल की नाही, माहिती नाही
आंतरवालीत मराठा समाजाशी संवाद साधताना उद्या मी असेल की नाही, आपली परत भेट होईल की नाही मला माहिती नाही. उपोषणाने आपले शरीर क्षीण होत आहे. समाजासाठी आणि समाजातील लेकराबाळासाठी मी जीव जाळत असल्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले. आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे असे ते म्हणाले. त्यांनी समाजाला या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. ही लढाई सोपी नाही. मेलो तरी चालेल पण आता मागे हटणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
बोलता बोलात हुंदका, अश्रू अनावर
हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज स्वीकारले जात नाही. मराठ्यांची अडवणूक होत असल्याची खंत जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. मराठा समाजाने सगळ्यांना मोठं केलं. पण आज तेच लोकं समाजातील लेकीबाळी आणि लेकराबाळांना मोठं होऊ देत नसल्याचे ते म्हणाले. समाजाने आता तरी जागे व्हावे. नेता हा तुमचा बाप नाही. तर समाज हा तुमचा बाप आहे. आपल्या मुलांना जपा. लेकरांना मोठं करा. पक्षाला आणि नेत्याला मोठं करून लेकराबाळांचे मुडदे पाडू नका. समाज मोठा असतो. नेता मोठा नसतो हे समजून घ्या, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
आपले लेकरं तुम्हाला मोठं नाही. सोन्यासारखं लेकरं आत्महत्या करत आहेत. तुम्ही कुणाचा उदोउदो करता. पक्ष आणि नेत्यांचा करता का? आमचा समाज इतका नामर्द कसा झाला. हातातोंडाला आलेला घास हे नेते खाऊ देत नाही. मी जीव या लेकराबाळांसाठी जाळतोय असे म्हणताना जरांगेंचा कंठ दाटून आला. त्यांना अश्रू अनावर झाले. जरांगे समाजासमोर रडले. त्यांनी समाजाला या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद करा
मुंबईत आंदोलनाची हाक देताना मोर्चा शांततेत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चात कुणीही हुल्लडबाजी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. समाजाची शिस्त दिसून देण्याचे आवाहन त्यांनी केले. कुणालाही त्रास होईल असे वागू नये असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. तर त्याचवेळी जर कुणाचं रक्त सांडलं तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला. मी काही संत नाही असे ते म्हणाले.
