‘देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यात सामील व्हावं आणि…’, जयंत पाटील असं का म्हणाले?
बिहार निवडणूकीपूर्वी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. बिहार निवडणूकीपूर्वी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
मतदार याद्यांमधील घोळाबाबत बोलताना फडणवीस यांनी, ‘राहुल गांधी म्हणत आहेत मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. हे आम्हालाही मान्य आहे. आम्ही तर इतक्या वर्षांपासून सांगतोय. आमची मागणी होती की, मतदार यांद्याचे सर्वसमावेश पु्र्नपडताळणी करा. आता निवडणूक आयोगानेही सर्वसमावेश पडताळणी करायला तयार आहोत असं म्हटलं आहे’ असं विधान केलं आहे.
यावर बोलताना जयंत पाटील यांनी, ‘ही चांगली गोष्ट आहे की फडणवीसांनी हे मान्य केलं की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आमची अशी इच्छा आहे की, त्यांना मतदार याद्यांवर संशय असेल तर त्यांनी आमचा जो प्रयत्न सुरु आहेत, ज्यात सामील व्हायला हवं आणि निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा’ असं विधान केलं आहे.
मला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता – शरद पवार
या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीबाबत भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, काल मला मुख्यमंत्र्यांनी कॉल केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मला विनंती केली की राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा. मी त्यांना सांगितलं की ते आमच्या विचाराचे नाहीत. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही. आम्ही आमचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सी. पी. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असताना झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली होती, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोग योग्य पद्धतीनं काम करत नाही
राहुल गांधी यांची बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरु आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, बिहार राजकीय दृष्टीने जागृत राज्य आहे, बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक आयोग त्यांचं काम योग्य पद्धतीनं करत नाही, मतदार यादीबाबत आमचा अभ्यास सुरू आहे.
